युवा प्रेरणा कट्टा’चा स्तुत्य उपक्रम! दापोलीत पोलीस बांधव अन् आरोग्यदूतांना राखी बांधून रक्षाबंधन उत्साहात साजरे

दापोली दि. २८ ऑगस्ट (सागर गोवळे) : सामाजिक बांधिलकी आणि कृतज्ञतेचा अनोखा संगम साधत कै. कृष्णामामा महाजन स्मृती प्रतिष्ठान, कोळथरे संचलित ‘युवा प्रेरणा कट्टा’ टीमने यावर्षीचा रक्षाबंधन सण अत्यंत उत्साहात आणि अनोख्या पद्धतीने साजरा केला. समाजाच्या रक्षणासाठी अहोरात्र पहारा देणारे दापोली पोलीस ठाण्याचे पोलीस बांधव आणि उपजिल्हा रुग्णालयातील सेवाभावी आरोग्य कर्मचार्यांना राख्या बांधून त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप मारण्यात आली.

‘युवा प्रेरणा कट्टा’च्या वतीने दरवर्षी ‘एक राखी जवानांसाठी’ हा खास उपक्रम राबवला जातो. या वर्षी या उपक्रमाची व्याप्ती वाढवत शालेय विद्यार्थ्यांसाठी ‘राखी बनवणे स्पर्धा’ तर उच्च माध्यमिक गटासाठी ‘जवानांना पत्रलेखन व कविता लेखन स्पर्धा’ आयोजित करण्यात आली होती. विद्यार्थ्यांनी स्वतःच्या हाताने बनवलेल्या या स्नेहाच्या राख्या विशाखापट्टणम येथील भारतीय नौदलाच्या (Naval Base) तळावर पाठवून सीमेवरील जवानांप्रती आदर व्यक्त करण्यात आला.
खाकी अन् पांढऱ्या कोटमधील रक्षक झाले भावूक!
सीमेवरील जवानांसोबतच आपल्या स्थानिक रक्षकांचे आभार मानण्यासाठी युवा टीमने दापोली पोलीस ठाणे आणि उपजिल्हा रुग्णाल गाठले.
पोलीस ठाण्यात रक्षाबंधन: दापोली पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक तोरसकर साहेब, पी.एस.आय. यादव, पी.एस.आय. साखरकर यांच्यासह सर्व पोलीस कर्मचाऱ्यांना राख्या बांधून त्यांच्या दीर्घ आयुष्यासाठी प्रार्थना करण्यात आली.
रुग्णालयात कृतज्ञता सोहळा: उपजिल्हा रुग्णालयातील डॉ. मोमीन, डॉ. बनसोडे, डॉ. भोजने, डॉ. मोघे आणि संपूर्ण आरोग्य पथकाला राखी बांधून त्यांच्या सेवाभावी वृत्तीचा सत्कार करण्यात आला.
आपल्या कुटुंबापासून दूर राहून कर्तव्य बजावणाऱ्या या रक्षकांनी ‘युवा प्रेरणा कट्टा’च्या या उपक्रमाचे मनापासून कौतुक केले आणि हा क्षण अत्यंत भावूक ठरला.
युवा टीमचे नियोजन ठरले आदर्श!
या संपूर्ण कार्यक्रमाचे नेटके आणि उत्कृष्ट नियोजन युवा प्रेरणा कट्ट्याचे श्रीप्रीति वैद्य, गौरी खरे, पायल खानविलकर, गौरी खोत, अवंती केळकर, ऋतिक उगले, प्रमोद पांगारकर, सुमेध करमरकर, नचिकेत बेहरे, मिहीर महाजन आणि गौरव खरे यांनी केले.
युवा पिढीने सामाजिक कर्तव्यातून दाखवलेल्या या परिपक्वतेचे आणि उपक्रमाचे दापोली तालुक्यातून सर्वत्र भरभरून कौतुक होत आहे.



