रत्नागिरी

सारस्वत स्नेहवर्धक मंडळाची वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न; गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

रत्नागिरी दि. २८ ऑगस्ट : सारस्वत स्नेहवर्धक मंडळ, रत्नागिरीची सन २०२५-२६ ची वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाली. यावेळी विविध शैक्षणिक, स्पर्धात्मक व व्यावसायिक परीक्षांमध्ये उल्लेखनीय यश संपादन करणाऱ्या गुणवंत सारस्वत विद्यार्थ्यांचा सत्कार करून त्यांना पारितोषिके प्रदान करण्यात आली.

कार्यक्रमाची सुरुवात शारदा स्तवन व पूजनाने झाली. त्यानंतर उपस्थितांचे स्वागत करण्यात आले. मंडळाच्या दिवंगत सारस्वत व्यक्तींना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. सभेचे इतिवृत्त सचिव श्री. प्रदीप तेंडुलकर यांनी वाचून दाखविले व त्यास मंजुरी देण्यात आली. खजिनदार सौ. मनीषा रेगे यांनी सन २०२५-२६ चा जमा-खर्च व ताळेबंद सादर केला. तसेच सन २०२६-२७ चे अंदाजपत्रक त्यांनी सभेसमोर मांडले व त्यास मंजुरी देण्यात आली. आगामी आर्थिक वर्षासाठी लेखापरीक्षकांची नियुक्तीही करण्यात आली.

यावेळी विविध परीक्षांमध्ये यश मिळविणाऱ्या गुणवंतांचा सत्कार करण्यात आला. कु. दुर्वांक प्रवीण प्रभूकेळुस्कर, कु. श्रीशांत प्रशांत दिवाडकर, कु. प्रार्थना गुरुप्रसाद बोरकर आणि कु. राजस दिनेश सिनकर यांनी इयत्ता ४ थी प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा उत्तीर्ण केली. कु. किमया महेश साखळकर हिने भूगोल प्रज्ञाशोध परीक्षेत द्वितीय क्रमांक मिळविला, तर कु. दुर्वा महेश कलवारी यांनी चित्रकला एलिमेंटरी परीक्षा A ग्रेडने उत्तीर्ण केली.

कु. तपस्या गुरुप्रसाद बोरकर हिने राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धांमध्ये यश मिळविले. कु. रुचिर राहुल आजगांवकर व कु. ओम विवेक कामत यांनी माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण केली. कु. रूपक ओमप्रसाद सातोस्कर व कु. साक्षी दिनेश सिनकर यांनी उच्च माध्यमिक शालान्त परीक्षा (विज्ञान शाखा) उत्तीर्ण केली. कु.सई अभय खानोलकरआणि सौ. भक्ती केयूर रेगे यांनी CA परीक्षा उत्तीर्ण केली. त्यांच्या या यशाबद्दल मंडळातर्फे गौरव करण्यात आला.

गुणवंतांचा सत्कार व पारितोषिक वितरणानंतर अध्यक्ष श्री. योगेश सामंत यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले. मंडळाच्या कार्याचा आढावा घेत भविष्यातील उपक्रमांसाठी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या शेवटी श्री. निनाद तेंडुलकर यांनी उपस्थितांचे आभार मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. विस्मया कुलकर्णी यांनी केले कार्यक्रमाला मंडळाचे सदस्य बहुसंख्य ज्ञातिबांधव उपस्थित होते.

गुणवंत विद्यार्थ्यांच्या विविध क्षेत्रांतील यशामुळे सारस्वत स्नेहवर्धक मंडळाच्या शैक्षणिक व सामाजिक कार्याला नवी प्रेरणा मिळाली असून, विद्यार्थ्यांनी मिळविलेल्या या यशाचे उपस्थितांनी कौतुक केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button