चिमुकल्यांचा गोपाळकाला! दापोलीतील फणसू मराठी शाळेत दहीहंडीचा जल्लोष

दापोली दि. ५ सप्टेंबर (सागर गोवळे) :- गोविंदा आला रे आला, गोकुळात आनंद झाला…’ या उत्साही गाण्यांच्या तालावर आणि ‘गोपाळकाला’च्या जयघोषात दापोली तालुक्यातील फणसू येथील जिल्हा परिषद मराठी शाळेत लहानग्या विद्यार्थ्यांनी दहीहंडी उत्सव अत्यंत उत्साहात आणि आनंदात साजरा केला.
उत्सवाच्या निमित्ताने शाळेच्या प्रांगणात खास पारंपरिक वातावरण निर्मिती करण्यात आली होती. लहान-लहान मुला-मुलींनी कृष्ण आणि राधा यांच्या नयनमनोहारी वेषभूषा साकारून उपस्थितांची मनं जिंकून घेतली. बालगोविंदांच्या पथकाने एकमेकांच्या खांद्यावर हात ठेवून शिस्तबद्ध थरांची उभारणी केली आणि टाळ्यांच्या कडकडाटात दहीहंडी फोडून बालमुकुंदाचा जयजयकार केला.
आनंदाचा आणि संस्कृतीचा संगम
शाळेतील शिक्षकांनी विद्यार्थ्यांना या सणाचे धार्मिक व सामाजिक महत्त्व समजावून सांगितले. दहीहंडी फोडल्यानंतर सर्व चिमुकल्यांना पोहे, फळे आणि गोपाळकाल्याच्या प्रसादाचे वाटप करण्यात आले. लहानग्यांच्या चेहऱ्यावरील ओसंडून वाहणारा आनंद आणि त्यांचा उत्साह पाहून उपस्थित पालकांचेही डोळे कौतुकाने भरून आले होते.
ग्रामीण भागातील सरकारी शाळांमध्ये अशा प्रकारे संस्कृती जपण्यासोबतच मुलांच्या चेहऱ्यावर हसू फुलवणारे उपक्रम राबवले जात असल्याने फणसू मराठी शाळेतील शिक्षकवृंद आणि व्यवस्थापन समितीचे सर्वत्र कौतुक होत आहे.
बालगोपाल आणि चिमुकल्या राधा-कृष्णांच्या या जल्लोषामुळे फणसू गावात खऱ्या अर्थाने गोकुळाचा आनंद अवतरला होता!



