कापडगावच्या तीव्र उतारावरील वळणावर मालवाहू ट्रकचा अपघात चालक जखमी

पाली , दि. ५ सप्टेंबर : मुंबई-गोवा महामार्गावर पाली नजीक कापडगावच्या तीव्र उतारावरील वळणावर शनिवारी सायंकाळी मालवाहू ट्रकचा अपघात झाला. या अपघातात ट्रक चालक जखमी झाला असून त्याला पुढील उपचारासाठी जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या मोफत रुग्णविकासेवेने रत्नागिरी येथील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दि. ५ सप्टेंबर रोजी सायंकाळी सुमारे ५ वाजण्याच्या सुमारास मालवाहू ट्रक क्रमांक MH-12 LT-8627 हा दमणहून गोव्याच्या दिशेने जात होता. कापडगाव येथील तीव्र उतारावरील वळणावर चालकाने महामार्गावरील वळणाची परिस्थिती लक्षात न घेता वाहन वेगाने चालविल्याने ट्रकचा अपघात झाला.
या अपघातात ट्रक चालक रफिक खज्जासाब मुलाणी (वय ४४, रा. विसापूर, ता. खटाव, जि. सातारा) यांच्या डाव्या पायाला दुखापत झाली. अपघाताची माहिती मिळताच हातखंबा येथील महामार्ग पोलीस घटनास्थळी दाखल झाले, ग्रामस्थांच्या मदतीने चालकाला केबिन मधून बाहेर काढण्यात आले, त्यांनी तातडीने उपचारासाठी जखमी चालकाला रुग्णवाहिकेतून रत्नागिरी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले.
अपघातात ट्रकचे मोठे नुकसान झाले आहे. अपघातग्रस्त वाहन रस्त्याच्या बाजूला करून महामार्गावरील वाहतूक सुरळीत करण्याचे काम सुरू करण्यात आले. या घटनेची पुढील कार्यवाही रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्याकडून सुरू आहे.



