पालकमंत्री उदय सामंत यांच्या आदेशानुसार गणपतीपुळे बीच पुन्हा सुरू!
स्थानिक ग्रामस्थ व व्यावसायिकांनी मानले पालकमंत्र्यांचे आभार!

गणपतीपुळे दि. ६ सप्टेंबर (वैभव पवार) :- जागतिक दर्जाचे पर्यटनस्थळ असलेल्या गणपतीपुळे येथील समुद्रकिनारा मागील दोन महिने बंद राहिल्यानंतर तब्बल साठ दिवसानंतर सुरू करण्यात आला.
परंतु हा बीच सुरु होऊन अवघे दहा दिवस झालेले असतानाच अचानकपणे 3 सप्टेंबर रोजी गणपतीपुळे बीच जिल्हा प्रशासनाच्या सुचनेनुसार गणपतीपुळे ग्रामपंचायतीकडून बंद करण्यात आला. त्यामुळे येथे स्थानिक ग्रामस्थ आणि पर्यटन व्यवसायिकांमध्ये प्रचंड नाराजी आणि तीव्र संताप व्यक्त करण्यात आला तसेच अनेक ग्रामस्थ व पर्यटन व्यावसायिक आक्रमक झाले. या सर्वांनी एकत्रित येऊन तात्काळ रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांची भेट घेण्याचे ठरविले.
तसेच जिल्हा परिषद सदस्य राजू साळवी यांच्या कानावर ही बातमी घालून त्यांच्यामार्फत रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांची भेट घेऊन शुक्रवारी 4 सप्टेंबर रोजी सायंकाळी रत्नागिरी येथे पालकमंत्री उदय सामंत, आमदार भैया सामंत आणि जिल्हाधिकारी अनुज जिंदल यांच्या प्रमुख उपस्थितीत एक विशेष बैठक घेण्यात आली.
यावेळी संबंधित ग्रामस्थ आणि पर्यटन व्यावसायिकांनी पालकमंत्र्यांकडे बीच सुरू करण्याची विनंती केली. तसेच येथील धोकादायक समुद्राच्या वस्तुस्थितीबाबत नेमकी माहिती देऊन सध्या समुद्रकिनाऱ्यावर पर्यटकांच्या सुरक्षेसाठी गणपतीपुळे ग्रामपंचायतीचे सहा जीव रक्षक दोन सत्रात व त्यांच्या जोडीला जयगड पोलीस ठाण्याचे अंतर्गत असलेले होमगार्ड कार्यरत असल्याची माहिती दिली. तसेच पर्यटकांना योग्य ते सूचना देण्याचे काम केले जात असल्याचे सांगण्यात आले.
एकूणच वस्तुस्थिती जाणून घेतल्यानंतर पालकमंत्री उदय सामंत यांनी जिल्हा प्रशासनाला गणपतीपुळे बीच तात्काळ पुन्हा सुरू करण्याचे आदेश दिले . तसेच तशा प्रकारे गणपतीपुळे ग्रामपंचायतीला कळविण्यात यावे असे जिल्हा सांगण्यात आले. त्यानुसार पुन्हा दोन दिवसांनी गणपतीपुळे बीच ग्रामपंचायतीने 5 सप्टेंबर पासून पर्यटकांसाठी खुला केला आहे.
हा बीच चालू करण्यासाठी जिल्हा परिषद सदस्य राजू साळवी यांच्या समवेत गणपतीपुळे येथील माजी उपसरपंच मयूर केदार,माजी सरपंच महेश ठावरे, कल्पेश सुर्वे,रवी ठावरे,अविनाश माने,उमेश भणसारी, विश्वनाथ पालकर, बंड्या घाणेकर, मंगेश गोताड, किशोर गुरव आदींनी पालकमंत्री उदय सामंत यांची भेट घेतली व बीच सुरू करण्याची विनंती केली.ही विनंती पालकमंत्र्यांनी तात्काळ मान्य केली.
यावेळी आमदार किरण(भैया)सामंत, जिल्हाधिकारी मनुज जिंदल, तालुकाप्रमुख बंड्या साळवी उपस्थित होते .यावेळी पालकमंत्री उदय सामंत यांनी बीचवर स्वच्छता ठेवण्याच्या सूचना देखील दिल्या आहेत. हा बीच सुरू केल्याबद्दल रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांचे गणपतीपुळे ग्रामस्थ व पर्यटन व्यावसायिकांनी विशेष आभार मानले आहेत.



