रत्नागिरी

जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.भास्कर जगताप : मानसिक आरोग्य सेवेला रत्नागिरीत नवी दिशा!

एप्रिल २०१८ पासून जिल्हा मानसिक आरोग्य कार्यक्रमाची यशस्वी वाटचाल; तळागाळापर्यंत पोहोचली मानसिक आरोग्य सेवा

रत्नागिरी दि. ५ सप्टेंबर : “शरीर निरोगी असेल तरच जीवन निरोगी” या संकल्पनेसोबतच मानसिक आरोग्यही तितकेच महत्त्वाचे आहे. मानसिक आजारांविषयी असलेले गैरसमज, भीती आणि सामाजिक कलंक दूर करून गरजू नागरिकांना वेळेत उपचार व समुपदेशन मिळावे, या उद्देशाने रत्नागिरी जिल्ह्यात एप्रिल २०१८ मध्ये जिल्हा मानसिक आरोग्य कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. गेल्या आठ वर्षांत या कार्यक्रमाच्या माध्यमातून जिल्ह्यातील मानसिक आरोग्य सेवा अधिक व्यापक आणि लोकाभिमुख करण्यात आल्या आहेत.

जिल्हा रुग्णालय, रत्नागिरी येथे OPD क्रमांक १४ मध्ये मानसिक आरोग्य कार्यक्रम कार्यरत असून याद्वारे मानसिक आरोग्याशी संबंधित विविध समस्या असलेल्या 38725 रुग्णांना तपासणी, उपचार, समुपदेशन आणि आवश्यकतेनुसार पुढील उपचारासाठी मार्गदर्शन करण्यात आले आहे.

गावागावात पोहोचली मानसिक आरोग्य सेवा –

मानसिक आरोग्य सेवा केवळ जिल्हा रुग्णालयापुरती मर्यादित न राहता ती ग्रामीण रुग्णालये, उपजिल्हा रुग्णालये आणि सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रांपर्यंत पोहोचविण्यात आली आहे. या ठिकाणी ‘मनशक्ती केंद्र’ म्हणून मानसिक आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यात येत आहेत.

या माध्यमातून नागरिकांना त्यांच्या जवळच्या आरोग्य संस्थेतच मानसिक आरोग्यविषयक प्राथमिक तपासणी, समुपदेशन, उपचार, औषधोपचार व आवश्यकतेनुसार तज्ज्ञांकडे संदर्भ सेवा मिळण्यास मदत होत आहे. त्यामुळे ग्रामीण व दुर्गम भागातील नागरिकांसाठी मानसिक आरोग्य सेवा अधिक सुलभ झाली आहे. आतापर्यंत प्राथमिक आरोग्य केंद्रामार्फत 55873 मानसिक आजारांदर्भात सेवा देण्यात आली आहे.

जनजागृतीवरही विशेष भर-

जिल्हा मानसिक आरोग्य कार्यक्रमाच्या माध्यमातून मानसिक आरोग्य जनजागृती, ताणतणाव व्यवस्थापन, आत्महत्या प्रतिबंध, व्यसनमुक्ती, किशोरवयीन मानसिक आरोग्य, महिलांचे मानसिक आरोग्य, भावनिक आरोग्य आणि समुपदेशन याबाबत विविध कार्यक्रम, प्रशिक्षण, व्याख्याने व शैक्षणिक संस्थामध्ये जनजागृती उपक्रम राबविले जात आहेत.

मानसिक आजार हा कमजोरीचा लक्षण नसून तो एक आरोग्यविषयक प्रश्न आहे आणि योग्य वेळी उपचार घेतल्यास त्यातून सुधारणा शक्य आहे, हा सकारात्मक संदेश समाजापर्यंत पोहोचविण्याचे काम या कार्यक्रमातून केले जात आहे.

एका फोनवर मानसिक आरोग्य मदत – Tele-MANAS 14416

मानसिक आरोग्यविषयक मदत, मार्गदर्शन किंवा समुपदेशनाची गरज असलेल्या नागरिकांसाठी केंद्र शासनाची Tele-MANAS हेल्पलाइन 14416 ही सेवा उपलब्ध आहे. मानसिक ताण, चिंता, नैराश्य, भावनिक अडचणी, व्यसनाशी संबंधित समस्या तसेच इतर मानसिक आरोग्यविषयक अडचणींबाबत फोनद्वारे मदत व मार्गदर्शन मिळू शकते.

“मनातील प्रश्न मनात ठेवू नका; मदत मागणे ही कमजोरी नसून धैर्याची पहिली पायरी आहे.” गरज भासल्यास जवळच्या आरोग्य केंद्रातील मनशक्ती केंद्राशी संपर्क साधावा किंवा Tele-MANAS 14416 या हेल्पलाइनचा उपयोग करावा.

एप्रिल २०१८ मध्ये सुरू झालेल्या जिल्हा मानसिक आरोग्य कार्यक्रमाने आठ वर्षांची वाटचाल पूर्ण केली असून, “मानसिक आरोग्य प्रत्येकासाठी, सेवा प्रत्येकाच्या जवळ” या उद्देशाने रत्नागिरी जिल्ह्यात मानसिक आरोग्य सेवेला अधिक व्यापक आणि प्रभावी स्वरूप देण्याचा प्रयत्न सातत्याने सुरू आहे.

तरी जास्तीत जास्त नागरिकांनी या सेवेचा लाभ घ्यावा,असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. भास्कर जगताप तसेच जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button