क्रीडारत्नागिरी

मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संचालक कार्यशाळेचे एसव्हीजेसीटी क्रीडा संकुलात उद्घाटन

संगमेश्वर दि. ३ ( प्रतिनिधी ) :- मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा विभागातर्फे संलग्न महाविद्यालयांच्या क्रीडा संचालकांसाठी पाचव्या कार्यशाळेचे उद्घाटन नुकतेच श्री. विठ्ठलराव जोशी चॅरिटिज ट्रस्टच्या एसव्हीजेसीटी क्रीडा संकुलात नुकतेच पार पडले. भविष्यातील सक्षम, कुशल आणि प्रशासकीयदृष्ट्या सक्षम क्रीडा संचालक घडविण्याच्या उद्देशाने हा उपक्रम आयोजित करण्यात आला असून, एसव्हीजेसीटी क्रीडा संकुल या उपक्रमाचे प्रभावी प्रशिक्षण केंद्र ठरत आहे.

पाच दिवस आयोजित केलेल्या कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. रवींद्र कुलकर्णी (आभासी उपस्थिती), बी. के. एल. वालावलकर रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. सुवर्णा पाटील, मुंबई विद्यापीठाचे क्रीडा संचालक डॉ. मनोज रेड्डी, विद्यापीठ क्रीडा समिती सदस्य डॉ. चंद्रकांत म्हात्रे तसेच एसव्हीजेसीटी क्रीडा संकुलाचे संचालक श्रीकांत पराडकर यांची प्रमुख उपस्थिती होती.

कार्यशाळेमध्ये खेळाडू कल्याण योजना, विविध शिष्यवृत्ती, नोंदणी प्रक्रिया सुलभ करणे, आर्थिक सहाय्य, स्पर्धांचे नियोजन, क्रीडा सुविधा व्यवस्थापन, NAAC मूल्यांकनामध्ये क्रीडा विभागाची भूमिका तसेच राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार क्रीडा विभागाच्या जबाबदाऱ्यांवर सखोल मार्गदर्शन करण्यात आले.

अध्यक्षीय भाषणात डॉ. सुवर्णा पाटील यांनी सांगितले की, “एसव्हीजेसीटी क्रीडा संकुलात आयोजित ही कार्यशाळा केवळ प्रशिक्षणापुरती मर्यादित नसून भविष्यातील क्रीडा नेतृत्व घडविण्याचा महत्त्वाचा उपक्रम आहे. अशा कार्यशाळांमुळे क्रीडा संचालकांचे ज्ञान, कौशल्य आणि व्यवस्थापन क्षमता अधिक सक्षम होईल. भविष्यातही वालावलकर रुग्णालय आणि येथील क्रीडा संकुल क्रीडा प्रतिभा विकासासाठी अशाच उपक्रमांना सातत्याने पाठबळ देईल.”

पहिल्या दिवशीच्या कार्यशाळेत डॉ. आनंद लुंकड यांनी NAAC मूल्यांकनातील क्रीडा विभागाच्या भूमिकेवर मार्गदर्शन केले, तर इंडियन ऑइलचे चीफ बिझनेस ऑफिसर तेजस गरुडिया यांनी खेळाडू घडविण्यासाठी प्रायोजकत्व, देणग्या, क्रीडा संस्कृती आणि संसाधन विकास या विषयांवर मार्गदर्शन केले.

कार्यशाळेच्या यशस्वी आयोजनासाठी विद्यापीठ क्रीडा समिती सदस्य, विविध महाविद्यालयांचे क्रीडा संचालक आणि वालावलकर वैद्यकीय महाविद्यालयाचे स्वप्नील क्षीरसागर, एसव्हीजेसीटी क्रीडा संकुलाचे विनायक पवार, प्रतीक्षा पेंढारी यांनी विशेष परिश्रम घेतले. उपस्थित सर्व क्रीडा संचालकांनी या उपक्रमाचे कौतुक करून भविष्यातही अशा प्रशिक्षण कार्यशाळा एसव्हीजेसीटी क्रीडा संकुलात नियमितपणे आयोजित करण्याची अपेक्षा व्यक्त केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button