उत्कर्ष महिलामंडळात ‘जागर नारी शक्ती’ अंतर्गत महिलांच्या मानसिक आरोग्याबाबत मार्गदर्शन

पूर्णगड, दि. ५ सप्टेंबर : उत्कर्ष महिलामंडळ, पूर्णगड ता.रत्नागिरी येथे श्रीकृष्ण मंदिर जीर्णोद्धारानिमित्त आयोजित हळदी-कुंकू समारंभाचे औचित्य साधून ‘जागर नारी शक्ती’ या उपक्रमांतर्गत महिलांच्या मानसिक आरोग्याबाबत मार्गदर्शन कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला.
या कार्यक्रमात महिलांना मानसिक आरोग्याचे महत्त्व, दैनंदिन जीवनातील ताण-तणावाची कारणे, तणावाचे व्यवस्थापन, सकारात्मक विचारसरणी तसेच मानसिक आरोग्याची काळजी घेण्याच्या उपाययोजना याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. महिलांनी आपल्या भावना मोकळेपणाने व्यक्त करणे, कुटुंबीय व इतरांशी संवाद साधणे तसेच मानसिक अडचणी जाणवल्यास योग्य वेळी तज्ज्ञांची मदत घेणे आवश्यक असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
कार्यक्रमासाठी मनोविकृती सामाजिक कार्यकर्त्या श्रीमती श्वेता मांजरेकर, तसेच सामाजिक आरोग्य परिचारिका, जिल्हा मानसिक आरोग्य कार्यक्रम, जिल्हा रुग्णालय, रत्नागिरी श्रीमती स्मिता गोठणकर यांनी मार्गदर्शक म्हणून उपस्थित राहून महिलांशी संवाद साधला. त्यांनी मानसिक आरोग्य, ताण-तणाव व्यवस्थापन आणि सकारात्मक जीवनशैली याबाबत मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान पंचायत समिती सदस्या श्रीमती कांचनताई नागवेकर यांनी भूषविले. त्यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. कार्यक्रमाच्या नियोजनासाठी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. भास्कर जगताप यांचे मार्गदर्शन लाभले.
महिलांच्या मानसिक आरोग्याविषयी जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने आयोजित या उपक्रमाला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. ‘नारी निरोगी तर कुटुंब निरोगी’ या संदेशातून महिलांनी स्वतःच्या मानसिक आरोग्याला प्राधान्य देऊन मानसिक आरोग्याबाबतच्या समस्यांकडे दुर्लक्ष न करता आवश्यकतेनुसार तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा, असे आवाहन करण्यात आले.
मदत हवी आहे? बोलून दाखवा!
टेली-मानस (Tele-MANAS) — १४४१६
टोल-फ्री मानसिक आरोग्य हेल्पलाइन
मानसिक ताण, चिंता, नैराश्य, भावनिक अडचणी किंवा आत्महत्येचे विचार येत असल्यास १४४१६ वर संपर्क करून व्यावसायिक मानसिक आरोग्य मदत घेता येते.



