रत्नागिरीसामाजिक

वालावलकर रुग्णालयात अकाली जन्मलेल्या बाळाला जीवनदान

संगमेश्वर दि.३ ( प्रतिनिधी ):- वालावलकर रुग्णालयाच्या नवजात शिशु अतिदक्षता विभागात अकाली जन्मलेल्या व जन्मानंतर गंभीर श्वासोच्छ्वासाच्या अडचणी असलेल्या एका नवजात बालिकेवर यशस्वी उपचार करून तिला निरोगी अवस्थेत घरी पाठविण्यात आले.

सौ. अश्विनी मोहिते यांच्या पोटी ३६ आठवड्यांच्या गर्भावधीत जन्मलेली ही बालिका बी. के. एल. वालावलकर रुग्णालयात जन्माला आली. जन्मानंतर बाळाने त्वरित रडणे सुरू केले नाही व श्वसनास त्रास जाणवत असल्याने तिला तातडीने नवजात अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले. प्रारंभी बाळाला श्वसनासाठी आवश्यक पुनर्जीवन उपचार , व्हेंटिलेटर सहाय्य व सर्फक्टंट थेरपी देण्यात आली. उपचारादरम्यान बाळामध्ये संसर्गाची लक्षणे दिसून आल्याने आवश्यक रक्त तपासण्या करून तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली प्रतिजैविके देण्यात आली. तसेच कावीळ व प्लेटलेट्स कमी होण्याची समस्या निर्माण झाल्याने फोटोथेरपी, प्लेटलेट ट्रान्सफ्युजन आणि इतर आवश्यक उपचार करण्यात आले. रक्तसंस्कृती तपासणीत संसर्गाचे निदान झाल्यानंतर संवेदनशीलतेनुसार औषधोपचार यशस्वीपणे पूर्ण करण्यात आले.

काही दिवसांच्या अतिदक्ष उपचारांनंतर बाळाची प्रकृती हळूहळू सुधारली. व्हेंटिलेटर व श्वसन सहाय्य कमी करत बाळाला स्वतः श्वास घेता येऊ लागला. नंतर बाळाने आईचे दूध तसेच चमच्याने दिले जाणारे दूध चांगल्या प्रकारे स्वीकारले. वजन, श्वसन व इतर सर्व जीवनावश्यक बाबी स्थिर झाल्यानंतर बाळाला निरोगी अवस्थेत डिस्चार्ज देण्यात आला.

या बाळावरील उपचार डॉ. अनिल कुरणे, डॉ.पार्वती हलबे , डॉ.अजिंक्य काळे यांच्या सह इतर वैद्यकीय तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली व देखरेखीखाली यशस्वीरीत्या पार पडले. या यशस्वी उपचारामुळे बी. के. एल. वालावलकर रुग्णालयाच्या नवजात अतिदक्षता विभागातील अत्याधुनिक सुविधा व तज्ज्ञ डॉक्टरांच्या समन्वित कार्याचा पुन्हा एकदा प्रत्यय आला आहे. रुग्णालय प्रशासनाने उपचार प्रक्रियेत सहभागी सर्व वैद्यकीय अधिकारी, परिचारिका व कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button