रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाची तत्परता; अंजणारी घाटातील भीषण ट्रेलर अपघातात चालकाचा जीव वाचविण्यात यश

रत्नागिरी दि. ३ :- मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील अंजणारी घाटातील बस स्टॉपजवळ रत्नागिरीकडून गोव्याच्या दिशेने जात असलेल्या ट्रेलर (क्र. MH-46-DC-2763) या वाहनाचा अचानक ब्रेक निकामी झाल्याने चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले व त्यामुळे ट्रेलरचा रस्त्यालगतच्या संरक्षक कठड्यावर जोरात आदळून भीषण अपघात झाला. हा अपघात शुक्रवारी दि. ३ रोजी सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास झाला.
या अपघाताची तीव्रता इतकी भीषण होती की ट्रेलरचा पुढील भाग पूर्णपणे चक्काचूर झाला. वाहनचालक राजकुमार रामकिशोर साहू (वय 35 वर्षे, रा. लोही, जिल्हा रिवा, राज्य मध्य प्रदेश) हा वाहनाच्या केबिनमध्ये गंभीर अवस्थेत अडकून पडला होता. तसेच ट्रेलरमधील कोटेड कॉईल मालाचेही मोठे नुकसान झाल्याचे दिसून आले.
या घटनेची माहिती डायल 112 वर प्राप्त होताच तात्काळ लांजा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री. निळकंठ बगळे, स.पो.नि. श्रीमती मैनदाड तसेच पोलीस अंमलदार यांनी कोणताही विलंब न करता तात्काळ घटनास्थळी धाव घेतली.
अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत व जीवाची पर्वा न करता पोलीस पथकाने जे.सी.बी, फायर ब्रिगेड आणि इतर बचाव यंत्रणांच्या मदतीने वाहनाची केबिन उघडून चालकाची सुखरूप सुटका केली. त्यानंतर जखमी चालकास तातडीने 108 रुग्णवाहिकेद्वारे रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.
या अपघातामुळे मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. मात्र लांजा पोलीस ठाण्याच्या पोलीस अधिकारी व अंमलदारांनी घटनास्थळी प्रभावी वाहतूक नियोजन करून अल्पावधीतच महामार्गावरील वाहतूक सुरळीत केली.
या संपूर्ण बचाव व मदत कार्यामध्ये लांजा पोलीस ठाण्याचे अधिकारी व अंमलदार, हातखंबा वाहतूक मदत केंद्राचे पथक, 108 आपत्कालीन रुग्णवाहिका सेवा, फायर ब्रिगेड, जे.सी.बी सेवा, स्थानिक नागरिक तसेच स्थानिक प्रसारमाध्यम प्रतिनिधी यांनी मोलाचे सहकार्य केले.
पोलीस अधीक्षक, रत्नागिरी श्री. नितीन दत्तात्रय बगाटे व अपर पोलीस अधीक्षक, रत्नागिरी श्री. बी.बी. महामुनी यांच्या मार्गदर्शनाखाली रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाने दिलेल्या तातडीच्या प्रतिसादामुळे जखमी चालकाचा जीव वाचविण्यात यश आले असून, आपत्कालीन परिस्थितीत पोलीस दलाने दाखविलेली तत्परता, समन्वय आणि मानवतावादी भूमिका अधोरेखित झाली आहे.
सदर अपघाताचा पुढील तपास लांजा पोलीस ठाणे मार्फत कार्यनयात येत आहे.



