रत्नागिरी

कुंडीचे सुपुत्र राजेश सावंत यांना जिपचा आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर

देवरुख दि. ५ सप्टेंबर (सुरेश सप्रे) :- संगमेश्वर तालुक्यातील शैक्षणिक, क्रीडा आणि सांस्कृतिक क्षेत्रात आपल्या कार्याचा ठसा उमटवणारे कुंडी गावचे सुपुत्र व आदर्श शाळा पूर येथील पदवीधर शिक्षक राजेश अर्जुन सावंत यांना रत्नागिरी जिल्हा परिषदेचा आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त झाला आहे.

शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय योगदान, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी राबविलेले विविध उपक्रम, शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी केलेले प्रयत्न तसेच शाळेच्या विकासासाठी दिलेले योगदान याची दखल घेत त्यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.

तालुक्यातील विविध शाळांमध्ये कार्य करताना त्या शाळांचा गुणवत्ता उंचावण्यासाठी विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाढविणे, नवोपक्रम राबविणे, शाळेला आधुनिक स्वरूप देणे आणि पालकांचा सहभाग वाढविणे या बाबींमध्ये त्यांनी सातत्याने पुढाकार घेतला. त्यामुळेच संगमेश्वर तालुक्यात त्यांची ओळख कर्तव्यतत्पर, अभ्यासू आणि विद्यार्थीहित जपणारे शिक्षक अशी निर्माण झाली.

स्काँलरशिप व स्पर्धा परीक्षांबाबत विद्यार्थ्यांमध्ये जागरूकता निर्माण करून विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी त्यांनी विशेष परिश्रम घेतले. नियमित अध्यापनाबरोबरच अतिरिक्त मार्गदर्शन, सराव परीक्षा, मार्गदर्शन यामुळे अनेक विद्यार्थ्यांना यशाची नवी दिशा दिली.

क्रीडा क्षेत्र हे त्यांच्या कार्याचे आणखी एक वैशिष्ट्यपूर्ण अंग आहे. क्रीडा शिक्षक म्हणून त्यांनी विद्यार्थ्यांमध्ये खेळाविषयी आवड निर्माण केली खो-खो या पारंपरिक खेळाबद्दल त्यांना विशेष प्रेम असून राज्यभरातील विविध स्पर्धांमध्ये पंच म्हणून त्यांनी जबाबदारी पार पाडत आहेत.

शाळा विकासाच्या कामांमध्ये सांवत यांचे योगदानामुळे मुख्यमंत्री स्वच्छ सुंदर शाळा अभियानात प्रथम क्रमांक मिळविला. त्यांत ही सिंहाचा वाटा उचलत शाळा परिसरात स्वच्छता, सुशोभीकरण, पर्यावरण संवर्धन, विद्यार्थ्यांमध्ये स्वच्छतेच्या सवयी आणि लोकसहभागाने शाळेने विविध उपक्रमांमध्ये उल्लेखनीय यश मिळविले आहे.

कुंडीसारख्या अती दुर्गम गावातील सुपुत्राला प्राप्त झालेला आदर्श शिक्षक पुरस्कार हा केवळ एका व्यक्तीचा सन्मान नसून शिक्षण, कला, क्रीडा आणि समाजसेवा यांचा संगम असलेल्या एका समर्पित जीवनप्रवासाचा गौरव असून त्यांच्या कार्यातून अनेक शिक्षक, विद्यार्थी आणि तरुणांना प्रेरणा मिळत राहील, असा विश्वास माजी जिप अध्यक्ष रोहन बने यांनी बोलताना व्यक्त केला.

राजेश अर्जुन सावंत यांना प्राप्त झालेल्या या पुरस्काराबद्दल त्यांचे आम. शेखर निकम, जिपचे उपाध्यक्ष विलास चाळके, जिप सदस्या सौ नेहा माने, माजी जिप सदस्य बारक्याशेठ बने, सभापती शर्वरी वेल्ये, उपसभापती प्रफुल्ल बाईत आदींनी अभिनंदन केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button