रत्नागिरी

इंडिया टुडेच्या सर्वेक्षण क्रमवारीत सलग नवव्यांदा राजेंद्र माने अभियांत्रिकी महाविद्यालयाचा समावेश

देवरुख दि. ३ :- इंडिया टुडे या प्रख्यात राष्ट्रीय मासिकातर्फे दरवर्षीप्रमाणे फेब्रुवारी २०२६ मध्ये भारतातील शासकीय तसेच खाजगी अभियांत्रिकी असे एकूण २७५ महाविद्यालयांचे सर्वेक्षण करण्यात आले. या सर्वेक्षणात संगमेश्वर तालुक्यातील आंबव येथील प्रबोधन शिक्षण प्रसारक संस्थेच्या राजेंद्र माने अभियांत्रिकी महाविद्यालयाचा भारतातील सर्वोत्तम खाजगी महाविद्यालयांच्या क्रमवारीत सलग नवव्या वेळी स्थान प्राप्त केले आहे.

या सर्वेक्षणानुसार राजेंद्र माने अभियांत्रिकी महाविद्यालय महाराष्ट्रात 33 व्या क्रमांकावर असून मुंबई विद्यापीठात नवव्या क्रमांकावर मानांकित झाले आहे. कोकणातील केवळ दोनच अभियांत्रिकी महाविद्यालयांचा या राष्ट्रीय क्रमवारीत समावेश करण्यात आला आहे.

या सर्वेक्षणामध्ये विविध निकषांच्या आधारे भारतातील महाविद्यालयांची क्रमवारी निश्चित करण्यात येते. महाविद्यालयाची सर्वांगीण माहिती, एन बी ए तसेच नॅक ऍक्रेडीटेशनची श्रेणी, प्रवेश प्रक्रिया, शिक्षण शुल्क, जमाखर्चाचा तपशील, प्राध्यापक व इतर कर्मचाऱ्यांची शैक्षणिक अर्हता व अनुभव, राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय परिसंवादातील सहभाग आणि शोधनिबंध सादरीकरण, देशविदेशातील माजी विद्यार्थी कार्यरत असलेल्या नामांकित आस्थापनांची माहिती व माजी विद्यार्थ्यांचा महाविद्यालयाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी हातभार, संदर्भग्रंथ आणि नामांकित नियतकालिकांनी समृद्ध ग्रंथालय, विद्यार्थी आणि प्राध्यापकांचा औद्योगिक जगताशी असणारा नियमित संपर्क आणि त्याद्वारे विद्यार्थी उद्यमशील होण्यासाठी केलेले प्रयत्न, विविध विषयावरील तज्ज्ञांची व्याख्याने व मार्गदर्शन, महाविद्यालयाच्या आवारातील शैक्षणिक तसेच क्रीडाविषयक सोयीसुविधा इत्यादी निकष यासाठी लावले जातात.

या सर्वेमधील इन्फ्रास्ट्रक्चर अँड लिविंग एक्स्पीरिअन्स या निकषामध्ये राजेंद्र माने महाविद्यालयाने महाराष्ट्रात तसेच मुंबई विद्यापीठातहि दुसरा क्रमांक पटकावला आहे. तसेच ऍकॅडेमीक एक्सलेन्स या निकषामध्ये महाराष्ट्रात बाविसावा तर मुंबई विद्यापीठात सातवा क्रमांक प्राप्त केला आहे. कोकणातून या सर्वेक्षणामध्ये सहभागी झालेल्या महाविद्यालयांमध्ये इन्फ्रास्ट्रक्चर अँड लिविंग एक्स्पीरिअन्स, प्लेसमेंट व करिअर प्रोग्रेशन व ऍकॅडेमीक एक्सलेन्स या तीनही निकषांमध्ये माने अभियांत्रिकी महाविद्यालय पुन्हा एकदा सरस ठरले आहे.

हे महाविद्यालय कोकण विभागातील नामांकित महाविद्यालय असून दुसऱ्यांदा झालेल्या नॅक मुल्यांकनामध्ये महाविद्यालयाने बी ++ ग्रेड प्राप्त केली आहे.

इंजिनीअरिंग महाविद्यालयाची निवड करताना NAAC सारखी मानांकने अतिशय महत्वाची मानली जातात. कारण अशा महाविद्यालयात उच्च दर्जाची पायाभूत सुविधा आणि चांगले शिक्षक आहेत असे सूचित केले जाते. यापूर्वीही महाविद्यालयाने ए आय सी टी इ –सीआय आय ने २०१६, २०१७ तसेच २०२० यावर्षी घेतलेल्या सर्वेक्षणात सुवर्ण श्रेणी प्राप्त केली होती. तसेच २०१८ चा आय एस टी इ चा बेस्ट कॅंपस अॅवार्ड या महाविद्यालयाने पटकावला होता. ‘आर वर्ल्ड इंस्टीट्युशन रँकिंग’ मध्येही महाविद्यालयाने स्थान मिळविले होते.

पुणे, मुंबई यासारख्या मोठ्या शहरांमधील महाविद्यालयांच्या तोडीचे दर्जेदार शिक्षण व सुविधा राजेंद्र माने सारख्या महाविद्यालयाने ग्रामीण भागात उपलब्ध करून दिल्याबद्दल अनेक पालकांनी समाधान व्यक्त केले असून अनेक विद्यार्थी स्थानिक पातळीवरील दर्जेदार उच्च शिक्षणाला व निसर्गरम्य कॅम्पसला पसंती देत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button