जिल्ह्यात आज पावसाचा ‘रेड अलर्ट’; २ ते ५ जुलै ‘ऑरेंज अलर्ट’
नागरिकांना सतर्क राहण्याचे आणि खबरदारी घेण्याचे प्रशासनाचे आवाहन

रत्नागिरी, दि. १ : प्रादेशिक हवामान विभाग, मुंबई यांनी दिलेल्या इशाऱ्यानुसार जिल्ह्यामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. १ जुलै २०२६ रोजी जिल्ह्यासाठी ‘रेड अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. काही ठिकाणी अतिवृष्टीची शक्यता आहे. तसेच २ जुलै ते ५ जुलै कालावधीत जिल्ह्यासाठी ‘ऑरेंज अलर्ट’ देण्यात आला आहे. घाटावर आणि कोकणात या काळात दरडी कोसळण्याचा आणि सखल भागात पूरसदृश परिस्थिती निर्माण होण्याचा मोठा धोका आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणतर्फे निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी यांनी सर्व नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले असून खालीलप्रमाणे मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.*
१. विजा चमकत असताना घ्यायची दक्षता:
टीव्ही, संगणक यांसारखी विद्युत उपकरणे बंद ठेवून मुख्य स्रोतापासून वेगळी करावीत.
दूरध्वनी (लँडलाईन) आणि मोबाईलचा वापर टाळावा.
विजा चमकत असताना घराबाहेर पडू नये. बाहेर असल्यास सुरक्षित इमारतीचा किंवा पक्क्या घराचा आश्रय घ्यावा.
विजेच्या खांबांपासून, उंच झाडांपासून आणि धातूच्या वस्तूंपासून लांब राहावे.
मोकळ्या परिसरात असल्यास गुडघ्यांमध्ये डोके घालून वाकून बसावे.
वीज पडण्याची पूर्वसूचना मिळवण्यासाठी मोबाईलवर ‘दामिनी APP’ (Damini App) डाउनलोड करावे.
२. दरड कोसळण्याची शक्यता लक्षात घेता घ्यायची काळजी:
घाट रस्यांवरील प्रवास टाळा: अतिवृष्टीच्या काळात घाट रस्त्यांवरून प्रवास करणे, विशेषतः रात्रीच्या वेळी अत्यंत धोकादायक ठरू शकते. अत्यावश्यक कारणाशिवाय प्रवास करू नये.
डोंगराच्या पायथ्याशी राहणाऱ्यांनी सतर्क राहावे: डोंगराच्या पायथ्याशी, उतारावर किंवा दरडप्रवण क्षेत्रात राहणाऱ्या नागरिकांनी सततच्या पावसात विशेष खबरदारी घ्यावी. दरडीची चिन्हे दिसल्यास तात्काळ प्रशासनाने उपलब्ध केलेल्या निवारण केंद्रात स्थलांतर करावे.
पाण्याचा निचरा सुरळीत ठेवा: घराच्या परिसरातील गटारे, नाले अडथळामुक्त ठेवावेत जेणेकरून माती सैल होण्याचे प्रमाण कमी होईल.
पूर्वलक्षणांची माहिती द्या: जमिनीत भेगा पडणे, झाडे किंवा वीजखांब कलणे, भिंतींना तडे जाणे किंवा पाण्याच्या प्रवाहात अचानक बदल झाल्यास तात्काळ ग्रामपंचायत, महसूल, पोलीस किंवा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाला कळवावे.
३. मुसळधार पावसात सर्वसामान्य नागरिकांसाठी सूचना:
आवश्यकता नसfieldस घराबाहेर पडणे टाळावे. बाहेर अडकल्यास पाऊस थांबेपर्यंत सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा.
पाण्यातून किंवा पुरातून पायी अथवा वाहनाने प्रवास करण्याचा धोका पत्करू नये.
प्रवासाला निघण्यापूर्वी हवामान, रेल्वे व रस्ते वाहतुकीची अधिकृत माहिती घ्यावी.
मच्छीमारांसाठी इशारा: मच्छीमारांनी या कालावधीत समुद्र किंवा खाडी किनाऱ्यावर मासेमारीसाठी उतरू नये.
कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका आणि अफवा पसरवू नका. हवामानाची अधिकृत माहिती https://mausam.imd.gov.in/ या संकेतस्थळावरून घ्यावी.



