रत्नागिरी

सेवा लोकाभिमुख व गतिमान व्हावी – गोवा परिक्षेत्राचे पोस्टल सेवा संचालक रमेश पाटील

'स्वतंत्र चिपळूण डाक विभागा'चा शुभारंभ ; रत्नागिरीच्या फेऱ्यांपासून नागरिकांची सोय

रत्नागिरी, दि.१ : तयार झालेला नवीन चिपळूण विभाग हा लोकांसाठी आहे. आपण सर्वजण जनतेचे सेवक म्हणून काम करतो. त्यामुळे आपल्या कामात गतिमानता आणि अचूकता असणे अत्यंत गरजेचे आहे. लोकांना सुलभ आणि सोयीस्कर रितीने टपाल खात्याची सेवा मिळावी, याच उद्देशाने या नवीन विभागाची निर्मिती करण्यात आली आहे, अशी अपेक्षा गोवा परिक्षेत्राचे पोस्टल सेवा संचालक रमेश पाटील यांनी व्यक्त केली.

उत्तर रत्नागिरीतील पाच तालुक्यांसाठी नव्याने निर्माण करण्यात आलेल्या स्वतंत्र ‘चिपळूण डाक विभागाचा’ (Postal Division) अधिकृत शुभारंभ फित कापून आणि कोनशिला अनावरण करून करण्यात आला. या प्रसंगी सहाय्यक पोस्टल सेवा संचालक संदीप कडगावकर, रत्नागिरी डाकघर अधीक्षक ज्ञानेश कुलकर्णी, नगरसेविका रसिका देवळेकर, प्रयास फाउंडेशनच्या अध्यक्ष रवीना गुजर प्रामुख्याने उपस्थित होते.

‘या’ ५ तालुक्यांचा समावेश

नव्याने सुरू झालेल्या चिपळूण विभागामध्ये उत्तर रत्नागिरीतील चिपळूण, दापोली, खेड, गुहागर, मंडणगड या पाच तालुक्यांचा समावेश करण्यात आला असून, येथील सर्व डाकघरे आता चिपळूण विभागाला जोडली गेली आहेत.

“माझ्या कारकिर्दीची सुरुवात याच भागातून

आपले जुने अनुभव सांगताना संचालक श्री. पाटील भावूक झाले. ते म्हणाले, “माझ्या कामाची पहिली सुरुवात दापोली विभागातून झाली होती. तत्कालीन परिस्थितीत या पाचही तालुक्यांचा कार्यभार मी एकटा सांभाळत होतो. ग्रामीण भागात काम करताना मला लोकांशी जोडले जाण्याचा समृद्ध अनुभव मिळाला. आजही या भागातील अनेक नागरिक माझ्या संपर्कात आहेत.”

यापूर्वी प्रशासकीय कामे किंवा तक्रारींसाठी नागरिकांना थेट रत्नागिरीला जावे लागत असे. आता ही कामे चिपळूण येथेच जलदगतीने होतील. स्थानिक स्तरावर कार्यालय आल्यामुळे तक्रारींचे निवारण आणि सेवांचा विस्तार जलद होईल. नवीन कर्मचाऱ्यांच्या बदल्यांच्या दृष्टीने हा विभाग सोयीचा ठरेल. कर्मचाऱ्यांना स्वतःच्या भागात राहून आपल्याच लोकांची सेवा करण्याची सुवर्णसंधी यामुळे मिळाली आहे.

उत्कृष्ट कर्मचाऱ्यांचा गौरव

विमा कलेक्शन आणि नवीन आर्थिक वर्षात सर्वाधिक खाती उघडणाऱ्या उत्कृष्ट अधिकारी व कर्मचाऱ्यांचा पदक, प्रशस्तीपत्रक आणि भेटवस्तू देऊन विशेष सन्मान करण्यात आला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक सहाय्यक डाकघर अधीक्षक अजय कदम यांनी केले, तर दिलीप बेडेकर यांनी उपस्थितांचे आभार मानले. या सोहळ्याला जिल्ह्यातील विविध पोस्ट कार्यालयांचे अधिकारी, कर्मचारी आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button