रत्नागिरी

संगम ज्ञानाचा, वारसा गडाचा ’ उपक्रमातून प्रचितगड पोहोचणार १० हजार विद्यार्थ्यांपर्यंत

संगमरत्न फाउंडेशनचा अभिनव उपक्रम

संगमेश्वर दि. २४ ( प्रतिनिधी ):- संगमरत्न फाउंडेशन यांच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या ‘संगम ज्ञानाचा, वारसा गडाचा’ या महत्त्वाकांक्षी उपक्रमांतर्गत संगमेश्वर तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांमधील १०,००० विद्यार्थ्यांना ‘किल्ले श्री प्रचितगड’ विषयक माहिती असलेल्या वह्यांचे मोफत वाटप करण्यात येणार आहे. हा कार्यक्रम सोमवार, दिनांक ६ जुलै २०२६ रोजी साखरपा, देवरुख, संगमेश्वर व कडवई या प्रमुख केंद्रांवर आयोजित करण्यात आला आहे.

संगमरत्न फाउंडेशन गेल्या काही वर्षांपासून सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक तसेच किल्ले श्री प्रचितगड संवर्धन क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करीत आहे. रक्तदान शिबिरे, वृद्धाश्रम साहित्य वाटप, प्रथम प्रतिसादक प्रशिक्षण कार्यशाळा, वृक्षारोपण, मराठी शाळांमध्ये शैक्षणिक साहित्य वाटप, विविध शैक्षणिक स्पर्धा, अंध व मूकबधिर विद्यार्थ्यांना मदत, जनजागृती पदयात्रा, प्रेरणादायी व्याख्याने तसेच प्रचितगड संवर्धनासाठी विविध उपक्रम यशस्वीपणे राबविण्यात आले आहेत.

प्रचितगडाचा इतिहास, वारसा आणि संवर्धनाची जाणीव नव्या पिढीपर्यंत पोहोचावी या उद्देशाने हा अभिनव उपक्रम हाती घेण्यात आला आहे.विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या वह्यांच्या मुखपृष्ठावर किल्ले श्री प्रचितगडाचे आकर्षक छायाचित्र, तर आतील भागात गडाचा इतिहास, वैशिष्ट्ये आणि प्रमुख वास्तूंची माहिती समाविष्ट करण्यात आली आहे. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये इतिहासाबद्दल कुतूहल निर्माण होण्यासोबतच गडसंवर्धनाच्या चळवळीला नवे बळ मिळणार आहे.

कार्यक्रम वेळापत्रक – सकाळी १०.०० वा. – जि.प.मराठी शाळा,साखरपा क्र. १, दुपारी १२.३० वा. – जि.प.मराठी शाळा,देवरुख क्र. ४, दुपारी ३.०० वा. – श्री.छत्रपती राजा संभाजी विद्यालय कसबा संगमेश्वर क्र. १, सायंकाळी ४.०० वा. – जि.प.मराठी शाळा,कडवई क्र. ४, या कार्यक्रमास देणगीदार, इतिहासप्रेमी,समाजसेवक, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, गट शिक्षणाधिकारी, बीट विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक, शिक्षकवर्ग, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य, माजी विद्यार्थी, ग्रामस्थ व इतिहासप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.प्रचितगड जनजागृतीसाठी विद्यार्थ्यांच्या माध्यमातून तालुकाभर राबविण्यात येणाऱ्या या उपक्रमाचे इतिहासप्रेमी, दुर्गप्रेमी आणि संगमेश्वरकरांकडून विशेष स्वागत व कौतुक केले जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button