कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या ९ साप्ताहिक गाड्यांना संगमेश्वर रोड रेल्वे स्थानकात थांबा देण्याची आग्रही मागणी
मागणीचे निवेदन निसर्गरम्य चिपळूण संगमेश्वर (रेल्वे) फेसबुक ग्रुपच्या माध्यमातून कोकण रेल्वेला सादर

संगमेश्वर दि. १३ :- रत्नागिरी जिल्ह्यातील ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाच्या संगमेश्वर तालुक्यातील प्रवाशांच्या सोयीसाठी संगमेश्वर रोड रेल्वे स्थानकावर ९ साप्ताहिक गाड्यांना थांबा देण्याची मागणी जोर धरू लागली आहे. यासंदर्भात आज कोकण रेल्वेचे रिजनल रेल्वे मॅनेजर शैलेश बापट यांची रत्नागिरी येथे भेट घेऊन “निसर्गरम्य चिपळूण” व “निसर्गरम्य संगमेश्वर रेल्वे” फेसबुक ग्रुपच्यावतीने निवेदन सादर करण्यात आले.
संगमेश्वर तालुका हा सुमारे १९६ गावांचा विस्तीर्ण परिसर असून पर्यटनदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा आहे. मार्लेश्वर, कर्णेश्वर, प्रचितगड, भवानी किल्ला तसेच छत्रपती संभाजी महाराज स्मारक, शृंगारपूर यांसारखी ऐतिहासिक व धार्मिक स्थळे येथे मोठ्या प्रमाणात पर्यटकांना आकर्षित करतात. त्यामुळे वर्षभर प्रवाशांची मोठी वर्दळ असते.
नेत्रावती एक्सप्रेस, पोरबंदर एक्सप्रेस आणि जामनगर एक्सप्रेस या गाड्यांना थांबा मिळाल्यानंतर प्रवाशांच्या संख्येत वाढ झालेली दिसून येत आहे. यावरून या स्थानकात प्रवाशांची संख्या वाढते आहे हे अधोरेखित होते. वाढता प्रवाशांचा प्रतिसाद, रोजचे वाढते उत्पन्न या गोष्टी ध्यानात घेतल्या तर अद्याप अनेक महत्त्वाच्या एक्सप्रेस गाड्या येथे न थांबल्यामुळे प्रवाशांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे कोकण रेल्वे प्रशासनाने खालील ९ गाड्यांना संगमेश्वर रोड येथे थांबा द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
केरळ संपर्क क्रांती एक्सप्रेस, अमृतसर सुपरफास्ट एक्सप्रेस, इंदौर सुपरफास्ट एक्सप्रेस, हापा सुपरफास्ट एक्सप्रेस, बांद्रा–मडगाव एक्सप्रेस, श्रीगंगानगर एक्सप्रेस, जबलपूर–कोकण एक्सप्रेस, दुरंतो एक्सप्रेस, मरूसागर एक्सप्रेस आदी गाड्यांचा समावेश आहे. या गाड्यांना थांबा दिल्यास प्रवाशांना मोठा दिलासा मिळेल तसेच परिसराच्या विकासालाही चालना मिळेल. रेल्वे प्रशासनाने या मागणीची तात्काळ दखल घेऊन सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा ग्रुपचे प्रमुख संदेश जिमन यांनी व्यक्त केली.



