रत्नागिरी

राजापूर तालुक्यात दहावीत प्रथम आलेल्या सिद्धेश शिंदे यांचा १५ ऑगस्टला सन्मान

कै. गंगाराम गवाणकर पुरस्काराची परंपरा कायम; मधुकर गोपाळ पावसकर यांनी यंदाची रोख रक्कम केली पुरस्कृत

जैतापूर दि. १३ ऑगस्ट :- मार्च २०२६ मध्ये झालेल्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेत राजापूर तालुक्यात प्रथम क्रमांकाने ९७.८० टक्के गुण मिळवून यश संपादन करणारे कुमार सिद्धेश ज्ञानेश्वर शिंदे यांचा स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी विशेष सत्कार करण्यात येणार आहे.

राजापूर तालुक्यातील दहावीच्या परीक्षेत प्रथम येणाऱ्या विद्यार्थ्याला रोख रुपये ५ हजार, प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह देण्याची परंपरा ज्येष्ठ नाटककार कै. गंगाराम गवाणकर यांनी सुरू केली होती. जाहीर केल्याप्रमाणे गतवर्षी त्यांनी स्वतः या पुरस्काराचे वितरण केले होते. त्यांच्या या प्रेरणादायी उपक्रमाची परंपरा यंदाही पंचक्रोशी ज्येष्ठ नागरिक संस्था, मिठगवाणे यांच्या माध्यमातून कायम ठेवण्यात आली आहे.

यंदाची रोख रक्कम संस्थेचे खजिनदार मधुकर गोपाळ पावसकर यांनी पुरस्कृत केली आहे. त्यामुळे गुणवंत विद्यार्थ्याच्या शैक्षणिक यशाचा गौरव करण्याबरोबरच सामाजिक बांधिलकीचेही दर्शन या उपक्रमातून घडत आहे.

या संस्थेचे अध्यक्ष विलास चेऊलकर , उपाध्यक्ष एकनाथ आडिवरेकर, सचिव रमेश राणे तसेच खजिनदार मधुकर पावसकर यांच्या माध्यमातून हा उपक्रम राबविण्यात येत आहे. संस्थेचे मुख्य प्रवर्तक श्रीधर बाबू पावसकर असून, संस्थेच्या पदाधिकाऱ्यांच्या पुढाकाराने गुणवंत विद्यार्थ्याच्या सत्काराची ही परंपरा पुढे सुरू आहे.

पुरस्कार वितरण व सत्कार समारंभ शनिवार, १५ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ८.३० वाजता साने गुरुजी विद्यामंदिर, जानशी, ता. राजापूर येथे होणार आहे. यावेळी सिद्धेश शिंदे यांना रोख पारितोषिक, प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह प्रदान करून त्यांचा गौरव करण्यात येणार आहे.

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणात प्रोत्साहन मिळावे, गुणवंत विद्यार्थ्यांच्या यशाचा सन्मान व्हावा आणि त्यांच्यात पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी आत्मविश्वास निर्माण व्हावा, या उद्देशाने सुरू करण्यात आलेला कै. गंगाराम गवाणकर पुरस्काराचा हा उपक्रम कौतुकास्पद ठरत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button