जागतिक युवा दिनानिमित्त विद्यार्थ्यांना आधुनिक शेतीची ओळख
रोटरी क्लब ऑफ रत्नागिरीचा स्तुत्य उपक्रम

रत्नागिरी दि. १३ ऑगस्ट : जागतिक युवा दिनाचे औचित्य साधून विद्यार्थ्यांमध्ये शेतीविषयी आवड निर्माण व्हावी, आधुनिक कृषी तंत्रज्ञानाची ओळख व्हावी तसेच कृषी क्षेत्रातील विविध करिअरच्या संधींची माहिती मिळावी, या उद्देशाने रोटरी क्लब ऑफ रत्नागिरीच्या वतीने पोदार इंटरनॅशनल स्कूल, रत्नागिरी आणि खेडशी येथील महालक्ष्मी विद्यालयात आधुनिक शेतीविषयक मार्गदर्शन व प्रात्यक्षिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. हा उपक्रम रोटरी क्लब ऑफ रत्नागिरी आणि ओंकार अॅग्रोटेक यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला.
विद्यार्थ्यांना शेतीचे केवळ पुस्तकी ज्ञान न देता आधुनिक कृषी यंत्रसामग्रीची प्रत्यक्ष ओळख करून देण्यात आली. विविध आधुनिक कृषी यंत्रे विद्यार्थ्यांना दाखवून त्यांची कार्यपद्धती, शेतीतील उपयोग तसेच यांत्रिकीकरणामुळे होणारी श्रम, वेळ आणि खर्चाची बचत याबाबत माहिती देण्यात आली.
विद्यार्थ्यांनीही या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद देत विविध यंत्रे प्रत्यक्ष हाताळून पाहिली. यंत्रे कशी कार्य करतात, त्यांचा शेतकऱ्यांना कसा फायदा होतो आणि आधुनिक शेतीमध्ये तंत्रज्ञानाची भूमिका काय आहे, याबाबत विद्यार्थ्यांनी उत्सुकतेने प्रश्न विचारले.
यावेळी निहार वैद्य यांनी विद्यार्थ्यांना आधुनिक यांत्रिक शेतीविषयी मार्गदर्शन केले. शेतीतील वाढते यांत्रिकीकरण, शेतकऱ्यांच्या श्रमात होणारी बचत, वेळेचे व्यवस्थापन आणि आधुनिक कृषी यंत्रांच्या माध्यमातून शेती अधिक सुलभ व कार्यक्षम करण्याच्या विविध संधींबाबत त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला.
सुमित कुळे, प्रोजेक्ट असोसिएट (Agriculture), जलजीविका यांनी पारंपरिक व आधुनिक शेती पद्धती, त्यातील बदल आणि आधुनिक कृषी तंत्रज्ञानाचे महत्त्व याबाबत सखोल मार्गदर्शन केले. तसेच कृषी क्षेत्र हे केवळ पारंपरिक शेतीपुरते मर्यादित नसून तंत्रज्ञान, संशोधन, कृषी अभियांत्रिकी, उद्योजकता, अॅग्री-बिझनेस आणि विविध आधुनिक क्षेत्रांमध्ये विद्यार्थ्यांसाठी मोठ्या प्रमाणात करिअरच्या संधी उपलब्ध असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
“शेती म्हणजे केवळ शेतात काम करणे नव्हे; अन्न, पर्यावरण, अर्थव्यवस्था आणि समाज या सर्वांचा शेतीशी थेट संबंध आहे,” हा संदेश विद्यार्थ्यांना देण्यात आला. भविष्यात डॉक्टर, इंजिनिअर, उद्योजक, अधिकारी किंवा अन्य कोणत्याही क्षेत्रात जाणाऱ्या विद्यार्थ्यांनी शेती आणि शेतकऱ्यांविषयी जाण व आदर बाळगणे आवश्यक असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
विद्यार्थ्यांना कृषी यंत्रे प्रत्यक्ष हाताळण्याची मिळालेली संधी, त्यांची उत्सुकता आणि त्यांनी विचारलेले प्रश्न यामुळे कार्यक्रमाला विशेष रंगत आली. विद्यार्थ्यांच्या मनात शेतीविषयी आदर, शेतकऱ्यांविषयी कृतज्ञता आणि आधुनिक कृषी क्षेत्राकडे सकारात्मक व व्यावसायिक दृष्टिकोन निर्माण करणे, हा या उपक्रमाचा मुख्य हेतू होता.
कार्यक्रमाला रोटरी क्लब ऑफ रत्नागिरीचे अध्यक्ष ॲड. मनिष नलावडे, पोदार इंटरनॅशनल स्कूलच्या प्राचार्या प्राजक्ती गायकवाड, खेडशी महालक्ष्मी विद्यालयाचे प्राचार्य सुभाष पाटील, रोटरी क्लबचे सचिव आनंद चौगुले, माजी शिक्षक व केंद्रप्रमुख तथा वरिष्ठ रोटरी सदस्य विनायक हातखंबकर सर, मंदार सावंतदेसाई, पोदार इंटरनॅशनल स्कूलच्या प्राध्यापिका आर्वी पाटील तसेच शिक्षकवर्ग उपस्थित होता.
विद्यार्थ्यांना आधुनिक शेतीची प्रत्यक्ष ओळख करून देत कृषी क्षेत्राकडे करिअरची नवी संधी म्हणून पाहण्यास प्रेरणा देणारा हा उपक्रम ठरला.


