रत्नागिरी नगर परिषद रत्नागिरी अंतर्गत “हर घर तिरंगा अभियान-२०२६ ” ध्वज विक्री केंद्राचे उद्घाटन

रत्नागिरी दि. १२ ऑगस्ट :- रत्नागिरी नगर परिषद रत्नागिरी अंतर्गत “हर घर तिरंगा अभियान-२०२६ ” ध्वज विक्री केंद्राचे उद्घाटन नुकतेच करण्यात आले.
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत केंद्र शासनाकडून सन २०२२ पासून “हर घर तिरंगा” ही मोहीम सुरू करण्यात आली आहे. लोकांच्या हृदयात देशभक्तीची भावना जागृत करणे तसेच भारतीय राष्ट्रध्वजाबद्दल जागरूकता वाढवणे, ही सदर उपक्रम राबविण्यामागील मूळ कल्पना आहे. “हर घर तिरंगा” मोहीम लोक चळवळ बनली असून या मोहिमेंतर्गत महाराष्ट्र राज्याने लक्षवेधी कामगिरी केलेली आहे. यावेळी वंदेमातरम् गीताला १५० वर्षे पूर्ण होत असल्याने यावर्षीच्या अभियानाची संकल्पना “वंदे मातरम्” च्या १५० वर्षांच्या स्मरणाशी जोडण्यात आलेली आहे. तसेच दिनांक १४ ऑगस्ट २०२६ रोजी “फाळणी भयावहता स्मृती दिन” देशभरात विविध स्मरण व जनजागृतीपर उपक्रमांद्वारे पाळण्यात येणार आहे.
त्यानुषंगाने केंद्र व राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनानुसार दिनांक ९ ऑगस्ट ते १७ ऑगस्ट २०२६ या कालावधीमध्ये सुद्धा “हर घर तिरंगा अभियान-२०२६ ” मोठ्या उत्साहात राबविण्यात येत आहे. या अभियांना एक भाग म्हणून आज बुधवार दिनांक १२ ऑगस्ट २०२६ रोजी रत्नागिरी नगरपरिषदेच्या लोकप्रिय नगराध्यक्षा सौ.शिल्पा प्रशांत सुर्वे यांनी तिरंगा ध्वज आपल्याच शहरातील DAY-NULM अभियानातील बचतगटांच्या शहर उपजीविका केंद्रा मार्फत योग्य किमती मध्ये शहरातील नागरिकांना सहज उपलब्ध होणेसाठी रत्नागिरी नगरपरिषदेच्या नवीन इमारती मधील तळमजल्यावर ध्वज विक्री केंद्राचे उद्घाटन करून शहरातील नागरिकांनी सदर केंद्रामधून ध्वज खरेदी करून तो आपल्या घरावर प्राप्त मार्गदर्शक सूचनानुसार फडकवावा असे अवाहन केले.
ध्वज विक्री केंद्राचे उद्घाटनप्रसंगी रत्नागिरी नगर परिषदेचे मुख्याधिकारी श्री. वैभव शरद गारवे, उपमुख्याधिकारी श्री.मयूर बेहेरे, नगर अभियंता श्री.यतिराज जाधव, लेखापाल श्री. हिमंत पाटील, वरिष्ट लिपिक श्री.जितेंद्र विचारे, मालमत्ता विभाग प्रमुख श्री. विजय कदम, शहर अभियान व्यवस्थापक श्री.संभाजी काटकर,अशफाक गारदी, तसेच बचतगटातील महिला उपस्थित होत्या.


