रत्नागिरीसामाजिक

गोळप कट्टाच्या ७७ व्या कार्यक्रमात बुद्धिबळाचे आंतरराष्ट्रीय पंच विवेक सोहनी यांचा सहभाग

रत्नागिरी दि. १३ :- गोळप कट्टाच्या मार्च २०२६ महिन्यातील तिसऱ्या शनिवारच्या ७७ व्या कार्यक्रमात मान्यवर म्हणून रत्नागिरी येथील बुद्धिबळाचे आंतरराष्ट्रीय पंच श्री. विवेक सोहनी होते. त्यांची मुलाखत घेतली श्री. अविनाश काळे यांनी.

मुलाखतीतून आपला प्रवास सांगताना त्यांनी असं सांगितलं की आमचे मूळ गाव बसणी. आम्ही रत्नागिरीत राहायला लागल्यामुळे शालेय शिक्षण पटवर्धन हायस्कुल येथे झालं. त्यानंतर अभ्यंकर कुलकर्णी महाविद्यालय येथे बारावी विज्ञान आणि नंतर फिनोलेक्स कॉलेज मध्ये इलेक्ट्रिकल इंजिनियर झालो. बुद्धिबळ ची आवड सातवी आठवीत असताना लागली. पण खरी गोडी कॉलेजमध्ये असताना लागली. बुद्धिबळ खेळता येत असलेली मुले मिळाली. कॉलेजकडून स्पर्धा खेळायला मिळाली. रत्नागिरीत कै. दिलीप टिकेकर यांनी चेसमेन संस्था सुरु केली होती. त्यामार्फत स्पर्धा घेत असत. त्या स्पर्धात भाग घ्यायचो. आपल्याकडचे पहिले राष्ट्रीय बुद्धीबळपटू कै. रामचंद्र सप्रे यांच्या स्मृती निमित्त दरवर्षी स्पर्धा घेतली जाते. २०१३ साली पहिली स्पर्धा रत्नागिरीत होती त्या स्पर्धेत मी खेळत होतो शिवाय मला स्पर्धेत मदतनीस म्हणून संधी मिळाली आणि मी प्रथमच सहाय्यक पंच म्हणून भूमिका निभावली.

यानंतर २०१५ मध्ये रत्नागिरीत पहिली फिडे मानांकन स्पर्धा झाली. त्यासाठी कोल्हापूर हून पंच आले होते. ते नेमके आजारी पडले होते. त्यांना मदतीला कॉम्प्युटर वापरू शकेल असा माणूस हवा होता. तिथे मला पहिली संधी मिळाली. बुद्धिबळ सॉफ्टवेअर वापरायला मिळालं. त्यानंतर मग पंच होण्याकडे कल वाढला. राष्ट्रीय पंच परीक्षा नाशिक येथे होती. त्याआधी कोल्हापूरला ट्रेन द ट्रेनर्स असा चेस इन स्कुलचा प्रशिक्षण कॅम्प होता. तिथूनच नागपूरला गेलो. परीक्षा देऊन राष्ट्रीय पातळीवर पंच झालो. फिडे ही आंतरराष्ट्रीय पातळीवरची एकमेव बुद्धिबळ संस्था आहे. २०० पेक्षा जास्त संलग्न देश यात आहेत. यामार्फत सतत बुद्धिबळ बाबत नियम ठरवणे, जगभरातील स्पर्धा समन्वय साधणे, रेटिंग ठरवणे. त्याबाबतीत नियम बनवणे इ.बुद्धिबळाबाबत सगळी कामे होत असतात. बुद्धिबळ मध्ये ऑलिम्पिक नाही ऑलिम्पियाड असतं. त्यात टीम चा खेळ असतो. वर्ल्ड चॅम्पिअनशिप असते. वर्ल्डकप मध्ये टॉप खेळाडूंची नॉकआउट स्पर्धा असते. बाकी सगळ्या स्पर्धा या साखळी पद्धतीने खेळल्या जातात.

फिडे रेटिंग म्हणजे खेळाडूंची क्षमता अभ्यासणे. जेवढं रेटिंग जास्त तेवढा खेळाडू उत्तम. सध्या कार्लसन चे रेटिंग सगळ्यात जास्त म्हणजे २८०० पेक्षा जास्त आहे. रेटिंग मिळवण्यासाठी रेटिंग असलेल्या पाच खेळाडूंबरोबर खेळून किमान अर्धा पॉईंट मिळवावा लागतो तर खेळाडू रेटिंग साठी पात्र होतो. त्याची सुरुवात १४०० ने सुरुवात होते. त्यानंतर तुम्ही जिंकाल तसे पॉईंट वाढतात आणि हरलं तर कमी होतात. चेसच्या सगळ्या पंच परीक्षा मध्ये १०० मार्क असतात त्यापैकी ८० मिळवावे लागतात. काही ऑब्जेक्टिव्ह काही डिस्क्रिप्टिव्ह असतात. काही केस स्टडी असतात. डावा मधील पोझिशन देऊन आपल्याला निर्णय द्यायला सांगतात.

बुद्धिबळ खेळात दोन जण खेळत असतात. त्यात पंच कशाला लागतात? असा प्रश्न पडतो. मात्र खेळाचे नियम, वाद याशिवाय अनेक गोष्टींसाठी पंच आवश्यक ठरतो. पंच हा आयोजक आणि खेळाडू यातील महत्वाचा दुवा आणि समन्वयक असतो. स्पर्धेत खेळाडूंना नियम सांगण्यापासून, त्यांच्या शंका निरसन, साखळी ड्रॉ लावणे ते अगदी निकालापर्यंत सगळी जबाबदारी पंचाची असते. स्पर्धेचे वातावरण, बोर्ड, बैठक व्यवस्था,आवश्यक सुविधा आहेत ना? हे पंचांना पहावे लागते. रेटेड खेळाडू ते पहिल्यांदा खेळणारा खेळाडू सगळ्यांना समान न्याय आणि सुविधा आहेत ना? याची जबाबदारी पंचांवर असते. स्पर्धेसाठी फिडे आयडी मिळवणे. फिडेशी समन्वय साधणे. ड्रॉ आणि स्कोअर सगळ्यांना कुठेही बसून साईटवर पहाता येईल हे पहाणे. ज्येष्ठ पंचाशी समन्वय साधून स्पर्धा नीट पार पाडणे ही सुद्धा पंचांची जबाबदारी असते.

२००५-०६ पर्यंत ड्रॉ हे हाती लिहून पाडले जात होते.तेव्हा खूप किचकट काम होते. त्यानंतर आता संगणकीय सॉफ्टवेअर पद्धतीने पाडले जातात. सध्या ९९ % स्पर्धा साखळी पद्धतीने होतात. ड्रॉ पाडताना जास्तीतजास्त पारदर्शक आणि सुयोग्य पद्धतीने पाडले जातात. पूर्ण स्पर्धा इंटरनेट वर असल्यामुळे चुकीचे काही करण्याचा प्रयत्न केला तरी तो सगळीकडे लक्षात येतो. त्यामुळे सहसा चुका केल्या जात नाहीत. नीतिमत्ता पाळली जाते. २०१८ मध्ये दिल्ली येथे कॉमनवेल्थ गेम्स झाले त्यावेळी फिडे पंच परीक्षा घेतली गेली. शक्यतो मोठ्या स्पर्धा चे वेळी अशा परीक्षा घेतल्या जातात परीक्षा स्वरूप ऑब्जेक्टिव्ह, डिस्क्रिप्टिव्ह आणि केस स्टडी होते. यात पहिला नंबर आला. सर्वात तरुण आंतरराष्ट्रीय पंच बनलो. त्यानंतर मला २०२२ मध्ये बुद्धिबळ ऑलिम्पियाड तामिळनाडू मध्ये झालं तिथे काम करायची संधी मिळाली. कोरोना काळात कोणताही देश आयोजन करत नसताना तामिळनाडू मुख्यमंत्री स्टॅलिन आणि भारत सरकार यांनी ही जबाबदारी स्वीकारली. खरंतर चार वर्ष तयारीसाठी मिळतात. मात्र तामिळनाडू सरकारने चार महिन्यात पूर्ण तयारी करून परदेशी खेळाडूंना आवश्यक सुविधा, रस्ते आणि असंख्य गोष्टी युद्धपातळीवर केल्या आणि स्पर्धा यशस्वी केली. त्या आयोजनात अखिल भारतीय बुद्धिबळ संघटना आणि राज्य सरकारने बारा – बारा जणांची कोअर कमिटी बनवली होती. मी अखिल भारतीय बुद्धिबळ संघटनेकडून बारा जणांत एक होतो. आयोजनात कोणतीही त्रुटी राहू नये यासाठी आमच्या बारा जणांच्या दिमतीला बारा डिपार्टमेंट चे बारा आय ए एस ऑफिसर्स दिले होते. आम्हाला जे हव असेल त्यासाठी हे सगळे अधिकारी वाहून घेतलेले होते. फूड सेफ्टी पासून ते व्हिसा पर्यंत सगळ्या गोष्टी पहायच्या होत्या. जगातील २००० खेळाडू या स्पर्धेत खेळत होते. त्यांना तक्रारीची कोणतीही संधी मिळू नये ही जबाबदारी आयोजक म्हणून आमच्यावर होती. या स्पर्धेत खेळाडूंना आय कार्ड देण्याची जबाबदारी माझ्यावर होती. त्यामुळे सगळ्या टॉप खेळाडूंना भेटण्याची संधी मिळाली. गुकेश ने या स्पर्धेत गोल्ड मेडल मिळवलं. त्याच्या यशाची सुरुवात या स्पर्धेतून झाली. यानंतर २०२५ मध्ये कतार येथील स्पर्धेत सहभागी होण्याची संधी मिळाली. स्पर्धा ब्रॉडकास्ट आणि कॉमेन्ट्री ची जबाबदारी येथे मिळाली होती. जगात शिकलेलं कधी फुकट जात नाही. तसं मला माझ्या इलेक्ट्रिकल डिग्री चा फायदा या क्षेत्रात झाला. तांत्रिक अनेक गोष्टी बुद्धिबळ स्पर्धेशी निगडित असतात. तिथे मला माझ्या ज्ञानाचा उपयोग झाला. खेळ सुरु असताना बोर्ड आपल्या कॉम्प्युटर वर घेऊन आपण कॉमेन्ट्री कुठूनही करू शकतो. माझे मित्र सागर शाह त्यांच्या चेसबेस इंडिया ह्या त्यांच्या कंपनीतर्फे हे काम करतात.

त्यांच्यामार्फत मला कतार ची संधी मिळाली. चेस मध्ये असंख्य संधी आहेत. फोटोग्राफी, थेट प्रक्षेपण इ मूळे बुद्धिबळ खेळाचा प्रसार होण्यास मदत होते. गोव्यातील स्पर्धेतही मला तांत्रिक गोष्टींवर काम करण्याची संधी मिळाली. २०१९ मध्ये मी नोकरी सोडून पूर्णवेळ बुद्धिबळ करायचे ठरवले. बाबांनी “तुला आवडतंय तर कर” सांगून पाठिंबा दिला. त्यामुळे तसा निर्णय घेतला. आज सात वर्षांनी मी योग्य निर्णय घेतल्याच मला जाणवतं.मी पूर्ण समाधानी आहे. गॅरी कॅस्पारोव्ह हा माझा खेळाडू म्हणून आवडता आहे. शिवाय स्वतः उत्तम खेळाडू असताना कार्लसन सारखे खेळाडू घडवण्यात मदत करणं हा त्याचा गुण जास्त भावतो . विश्वनाथन आनंद सुद्धा हल्ली वाका अकॅडमी मार्फत प्रग्नानंदा गुकेश सारखे खेळाडू घडवतो याचा आनंद आहे. सध्या विविध स्पर्धाचं ब्रॉडकास्ट करणे, ऑनलाईन, ऑफलाईन क्लास घेणे सुरु आहे. मुकुल माधव विद्यालयात बुद्धिबळ शिकवतो. अमेरिका, सिंगापूर सारख्या चार देशात ऑनलाईन बुद्धिबळ शिकवतो. चेस ही इंडस्ट्री म्हणून पाहिलं तर यामध्ये फोटोग्राफी, ग्राफिक डिझाईन, ब्रॉडकास्ट, इलेक्ट्रॉनिक बोर्ड कनेक्टिन्ग अशा अनेक गोष्टी करण्यासारख्या आहेत. करिअर साठी खूप गोष्टींमध्ये संधी आहे. मात्र यासाठी मनुष्यबळाची कमी आहे. परदेशी आणि भारतीय खेळाडूंत विशेष फरक नाही जाणवला. कारण रेटिंग नुसार खेळाडू त्या पातळीवर पोचलेले असतात. भविष्यात चेसमेन आणि जिल्हा बुद्धिबळ संघटना काम करत्ये तसं रत्नागिरीत गावागावात स्पर्धा व्हाव्यात, खेळाडू वाढावेत, त्यांना प्रोत्साहन द्यावं अशी इच्छा आहे.

यानंतर श्रोत्यांच्या प्रश्नांना उत्तर देताना…..चेस मध्ये तीन प्रकार आहेत. क्लासिकल त्यात साधारण साडेतीन तास एक डाव चालतो. दुसरा रॅपिड यात जास्तीतजास्त ५९ मिनिटे खेळ चालतो, ब्लिटझ मध्ये साधारण ९ मिनिटात खेळ संपतो. आता बुलेट प्रकार आला आहे. यात दोन मिनिटात खेळ संपतो. चेस हा चिकाटी आणि संयम याची परीक्षा घेणारा खेळ आहे. ज्याच्याकडे या गोष्टी आहेत. तो यशस्वी होतो. विविध ओपनिंग या खेळाडू, स्पर्धा या नावे ओळखल्या जातात. मात्र नवीन खेळाडूंनी ओपनिंग नुसार खेळू नये आणि त्या शिकवूही नये असं अनेक तज्ञ प्रशिक्षकांचं मत आहे.

एंडगेम आणि मिडल गेम वर जास्त फोकस करावा, मुलांना नैसर्गिक खेळ खेळू द्यावा. कॅसलिंग ही चाल राजाला सेफ करण्यासाठी खेळली जाते. त्याचे नियम सांगितले. सायमल टेनस गेम म्हणजे एकाचवेळी अनेकांबरोबर खेळणे हा खूपदा इव्हेंट असतो आणि त्या खेळणाऱ्या खेळाडूची क्षमता असते.

सध्या चिपळूण, खेड, लांजा, राजापूर येथे विविध खेळाडू मार्फत चेस प्रशिक्षण सुरु आहे. त्यामुळे चेसचा चांगला प्रसार होईल. चेस खेळून संयम, चिकाटी वाढते. बैठक तयार होते. एकाचवेळी अनेक चालिंचा विचार करण्याची सवय रोजच्या आयुष्यात नक्की उपयोगी पडते. चौकस विचार आणि निर्णयक्षमता वाढते. माझ्या सगळ्या यशात आणि करिअर मध्ये आई, बाबा, पत्नी, सासू,सासरे यांचे मोलाचे योगदान आहे.

तसेच बुद्धिबळ क्षेत्रात चैतन्य भिडे, कै. टिकेकर काका, जिल्हा संघटनेचे व राज्य संघटनेचे पदाधिकारी यांचे योगदान आहे.

याशिवाय त्यांनी चेस बद्दल अनेक गोष्टी, अनुभव, किस्से आणि माहिती सांगितली.

गोळप कट्टा गेली अनेक वर्षे सातत्याने सुरु आहे याच कौतुक आहे. हा असाच कायम सुरु रहावा असेही सांगितले. यानंतर श्रोत्यांमधील श्री. विवेक सोहनी यांचे बाबा श्री.सोहनी सर यांचेहस्ते त्यांचा सन्मान करून कार्यक्रम संपला.

आता पुढील महिन्याच्या तिसऱ्या शनिवारी पुन्हा भेटू एका वेगळ्या व्यक्ती बरोबर….

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button