रत्नागिरी

गोवेश्वर महाशिव मंदिरात प्राणप्रतिष्ठा व कलशारोहण

जगद्गुरु नरेंद्राचार्यजी, मुख्यमंत्री प्रमोद सावंत व अनेक साधूसंतांची उपस्थिती

पणजी, दि. १६ :- जगद्गुरु रामानंदचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या कल्पनेतून साकारलेल्या ओल्ड गोव्यातील वायंगणी येथील भव्य गोवेश्वर महाशिव मंदिरात महाशिवरात्रीचे अवचित्य साधून प्राणप्रतिष्ठा व कलशारोहण सोहळा विधीवत व मोठ्या थाटामाटात झाला. गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत व सौ. सुलक्षणा सावंत यांच्या हस्ते धार्मिक कार्यक्रम झाले.

धार्मिक विधी झाल्यानंतर मुख्य मंत्र्यांनी सपत्नीक मंदिराबाहेर येऊन पूजाविधी संपन्न झाल्याचे व मंदिर सर्वांना दर्शनासाठी खुले झाल्याचे जाहीर केले आणि मंडपातील हजारो भक्तांनी टाळ्या वाजवून आनंद व्यक्त केला,

महाशिवरात्रीनिमित्त आयोजित या सोहळ्यात जगद्गुरु रामानंदचार्य नरेंद्राचार्यजी, प.पू. कानिफनाथ महाराज तसेच देशभरातून आलेले वेगवेगळ्या आखाड्याचे साधुसंत यांची उपस्थिती होती. सर्व धार्मिक विधी नाशिकचे वेदशास्त्र संपन्न भालचंद्रशास्री शौचे गुरुजी व त्यांच्या सहकाऱ्यांनी केले.

मुख्यमंत्री सावंत यांचे आज सकाळी कार्यक्रमस्थळी आगमन झाले. त्यांनी मंदिर व सर्व परिसर पहिला. मंदिराच्या उभारणीबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला. त्यानंतर प्राणप्रतिष्ठा विधीमध्ये त्यांनी सहभाग घेतला. गोवेश्वर महाशिव मंदिरातील सहा फूट उंचीच्या पिंडीचे पूजन केले. त्यांच्या हस्ते प्राणप्रतिष्ठा व कलशारोहण झाले. कलशारोहणावेळी मंदिरावर ध्वजारोहणही करण्यात आले.

त्यानंतर झालेल्या कार्यक्रमात मुख्यमंत्री डॉ. सावंत म्हणाले, “गोव्याच्या सांस्कृतिला मोठी परंपरा आहे. मध्यंतरीच्या काळात ती नष्ट करण्याचा प्रयत्न झाला, मात्र तो सफल झाला नाही. जगद्गुरु रामानंदचार्य नरेंद्राचार्यजी यांनी उभारलेल्या या मंदिरामुळे गोव्याच्या संस्कृतीत भर पडली आहे. ती आणखी पाचशे वर्षे जिवंत राहील एवढे ऐतिहासिक काम स्वामीजींनी केले आहे. त्यांनी नेहमीच रंजल्या – गांजल्यासाठी काम केले आहे.”

गोव्यातील हे मंदिर पाषाणातील कोरीव कलाकृती आहे. यासाठी चुनार दगडाचा वापर करण्यात आला आहे. बांधकामात कुठेही लोखंड वापरलेले नाही. येथे बारा ज्योतिर्लिंगांची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. त्यामुळे एकाच ठिकाणी बारा ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेण्याचा आनंद येथे मिळणार आहे.

येथे गेले तीन दिवस सुरू असलेल्या भव्य सोहळ्याची आज सांगता झाली. संपूर्ण सोहळ्यात साधुसंत, भाविक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

हा सोहळा अनुभवण्यासाठी महाराष्ट्रासह कर्नाटक गुजरात तेलंगाना छत्तीसगड मध्य प्रदेश यासारख्या अनेक राज्यातून हजारो भाविक गोव्यात दाखल झाले होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button