“शिक्षणातून डोक्यासह पोटाचाही विचार व्हावा” – प्रा. मिलिंद जोशी
मांडकी–पालवण येथे पहिल्या ग्रामीण कृषी सहकार साहित्य संमेलनाचा उत्साहात समारोप

सावर्डे, दि. १६ : मांडकी–पालवण येथे आयोजित राज्यातील पहिल्या ग्रामीण कृषी सहकार साहित्य संमेलनाचा रविवारी उत्साहपूर्ण वातावरणात समारोप झाला. शिक्षण, कृषी आणि सहकार या ग्रामीण विकासाच्या त्रिवेणी संगमाचा वेध घेत तीन दिवस चाललेल्या या संमेलनाने ग्रामीण भागातील विकासाच्या नव्या वाटा अधोरेखित केल्या.
समारोपप्रसंगी अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांनी बदलत्या काळात शिक्षणाच्या स्वरूपावर भाष्य करताना स्पष्ट भूमिका मांडली. “आज विविध क्षेत्रात झपाट्याने बदल होत आहेत. केवळ बौद्धिक शिक्षण देऊन उपयोग नाही. तरुणांच्या पोटाचा प्रश्न सुटला नाही, तर देश महासत्ता होण्याची स्वप्ने फोल ठरतील. त्यामुळे शिक्षण देताना डोक्याबरोबरच पोटाचाही विचार झाला पाहिजे,” असे ते म्हणाले.
महाराष्ट्रात ग्रामीण साहित्य, कृषी आणि सहकार विषयक संमेलने स्वतंत्रपणे होत असली, तरी या तिन्ही विषयांचा एकत्रित विचार करणारे हे संमेलन महत्त्वाची पायरी ठरल्याचे त्यांनी नमूद केले. सहकार क्षेत्राचे अनेकदा नकारात्मक चित्रण केले जाते; मात्र ग्रामीण अर्थकारण बळकट करण्यात सहकार संस्थांचे मोठे योगदान आहे, असेही त्यांनी सांगितले.
रविवार, १५ फेब्रुवारी रोजी ‘कृषी साहित्य व शेती सुधारणा’ आणि ‘आता आत्महत्या थांबवूया’ या विषयांवर परिसंवाद झाले. शेतकऱ्यांच्या आत्महत्यांमागील सामाजिक आणि मानसिक कारणांवरही चर्चा झाली. “केवळ नापिकी किंवा कर्जबाजारीपणा नव्हे, तर हरवलेला स्वाभिमान आणि सामाजिक उपेक्षा हेही आत्महत्यांमागील मोठे कारण आहे,” असे मत प्रा. जोशी यांनी व्यक्त केले. जागतिक हिरोंपेक्षा आपल्या मातीतल्या कर्तृत्ववान शेतकऱ्यांच्या यशोगाथा साहित्यामध्ये याव्यात, असेही त्यांनी आवर्जून सांगितले.
या वेळी कृषी क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे संजय माने, योगेश खराडे, हरिश्चंद्र देसाई आणि डॉ. अकुश चोरमुले यांचा सत्कार करण्यात आला. त्यांच्या प्रयोगशील शेतीच्या कथा उपस्थितांसाठी प्रेरणादायी ठरल्या.
कृषिभूषण डॉ. तानाजीराव चोरगे शिक्षण व संशोधन संस्था यांच्या वतीने आयोजित या संमेलनात डॉ. तानाजीराव चोरगे यांची प्रकट मुलाखत दैनिक सकाळचे माजी संपादक यमाजी पालकर यांनी घेतली. आपल्या जीवनसंघर्षाचा प्रवास उलगडताना डॉ. चोरगे यांनी विविध विषयांवर परखड भाष्य केले. आतापर्यंत ४९ पुस्तके प्रकाशित झाल्याचे सांगत “मी माझं गाव शोधतोय” या विषयावर ५० वे पुस्तक लिहीत असल्याची माहिती त्यांनी दिली. संमेलनाचा उद्देश यशस्वी झाल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.
आमदार शेखर निकम यांनी ज्ञान, कष्ट आणि आत्मपरीक्षण यांची सांगड घालण्याचे महत्त्व अधोरेखित केले. “ज्ञान असेल तर आपण चांगले बोलू शकतो; पण अज्ञानाची जाणीव असेल तर शिकण्याची तयारी राहते. तरुणांनी शॉर्टकट टाळून मेहनतीवर भर द्यावा,” असे त्यांनी आवाहन केले.
संमेलनाचे प्रमुख कार्यवाह डॉ. निखील चोरगे यांनी सर्व साहित्यिक, मान्यवर व ग्रामस्थांचे आभार मानले. संमेलनासाठी त्यांनी घेतलेल्या परिश्रमांचे आमदार निकम व उपस्थित मान्यवरांनी विशेष कौतुक केले. संमेलनात उभारलेल्या विविध स्टॉल्सनाही उत्तम प्रतिसाद मिळाला.
समारोपावेळी संयोजन समितीचे अध्यक्ष व ज्येष्ठ साहित्यिक प्रकाश देशपांडे यांनी दोन महत्त्वाचे ठराव मांडले. कसबा येथे छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकासाठी ३०० कोटी रुपयांचा निधी तातडीने द्यावा, अशी मागणी करण्यात आली. तसेच कोकणातील डोंगराळ भौगोलिक परिस्थिती लक्षात घेऊन संचमान्यता धोरण रद्द करून मराठी शाळांना जिवदान द्यावे, असा ठरावही संमेलनात करण्यात आला.



