
रत्नागिरी दि. ३० : राज्याच्या राजकारणात रत्नागिरी जिल्ह्याचे महत्त्व वाढत आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुती पूर्ण ताकदीने उतरली असून, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील ‘विकासाचा बुस्टर डोस’ घेऊन आम्ही सर्वच्या सर्व जागा जिंकू. राष्ट्रवादी शरद पवार गट आणि काँग्रेस महाराष्ट्रातून अदृश्य झाल्यासारखे दिसत आहेत, असा टोला भारतीय जनता पार्टीचे (भाजप) आमदार आणि प्रदेश उपाध्यक्ष प्रसाद लाड यानी लगावला.
आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकातही महायुती कायम राहणार असे श्री . लाड यांनी सांगितले. बंडखोरी करणाऱ्यांना पक्षाचे दरवाजे कायमचे बंद, असेही त्यांनी भाजपा कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. यावेळी निवडणूक जिल्हा संयोजक ॲड. दीपक पटवर्धन, शहर संयोजक सचिन वहाळकर, शहराध्यक्ष दादा ढेकणे, भाजपचे उमेदवार आदी उपस्थित होते.
श्री. लाड म्हणाले, ‘महायुतीचा विकास अजेंडा कोकणात रुजत असताना, राष्ट्रवादी शरद पवार गट आणि काँग्रेस महाराष्ट्रातून अदृश्य झाल्यासारखे दिसत आहेत. जिल्ह्याचा प्रभारी म्हणून अनेक वर्षे काम केल्याच्या अनुभवानंतर आपण प्रदेशाध्यक्षांच्या आदेशानुसार येथे आलो. नगर पालिका अध्यक्षपदाचे आणि नगरसेवकपदाचे भाजपचे सर्व उमेदवार निश्चितपणे विजयी होतील. राज्य सरकारच्या शहर आणि ग्रामीण भागाच्या विकासाचे धोरण हा महायुतीचा निवडणुकीतील मुख्य आधार आहे. पंतप्रधान आवास योजनेसह सर्व केंद्रीय योजनांचा लाभ सर्वसामान्य नागरिकांपर्यंत थेट पोहोचवून, केंद्र, राज्य आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या समन्वयातून रत्नागिरीचा विकास साधणे हे आमचे उद्दिष्ट आहे. पालकमंत्री उदय सामंत यांच्या नेतृत्वात जिल्ह्याचा विकास होत आहेच, पण भारतीय जनता पार्टीची साथ मिळाल्यास एक अनुभवी नेतृत्वाखाली जिल्ह्याचा विकास अधिक गतीने होईल.
प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी युतीबद्दल केलेल्या विधानाची चुकीच्या पद्धतीने माध्यमांनी तोडफोड केली. युती अभेद्य आहे. नारायण राणेंबद्दल आम्हाला सर्वांना आदर आहे. ते जिल्ह्याचे नव्हे, तर राज्याचे नेते आहेत. राणेंचा आदर ठेवून निर्णय घेतले गेले आहेत. ‘युती टिकली पाहिजे आणि युती कायम राहिली पाहिजे,’ ही प्रदेशाध्यक्षांची स्पष्ट सूचना असून, त्यानुसार संपूर्ण राज्यात काम सुरू आहे, असे लाड यांनी सांगितले.



