आरोग्य म्हणजे काय हो?

लतिका पेजे – ताम्हणकर, रत्नागिरी

नमस्कार वाचक मित्रहो,
आपण सारेजण रोजच पेपरच्या पहिल्या पानावर न चुकता सोन्या-चांदीचे भाव बघतो. पण खरा भाव कोणत्या गोष्टीला आहे ? हे आपल्याला कधी माहितच नाही . खरा भाव आहे तो आपल्या आरोग्याला.
आज प्रत्येकाच्या हातात मोबाईल आहे, घरात एसी आहे, खिशात पैसे आहेत पण विचार करा आपल्याला शांत झोप आहे का? रोजच्या रोज पोट साफ होते का? मन प्रसन्न आहे का? यापैकी एकाचेही उत्तर ‘नाही’ असेल तर आपण श्रीमंत असूनही गरीबच आहोत. कारण आयुर्वेद सांगते , धर्मार्थकाममोक्षाणाम् आरोग्यं मूलमुत्तमम्।
म्हणजेच धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष या चारही पुरुषार्थांचे मूळ हे आरोग्य आहे. आरोग्य नसेल तर बाकी काहीही नाही.
गुगलवर ‘डोकेदुखीवर उपाय’ टाकले की हजार उपाय येतात. पण माझ्या डोकेदुखीचे कारण काय हे गुगल कधीच सांगत नाही.
आधुनिक औषधे रोगावर काम करतात तर आयुर्वेद रोग्यावर काम करते. प्रत्येक माणूस वेगळा आहे. कुणाला दही पचते तर कुणाला लगेच सर्दी होते. कुणाला उन्हात त्रास होतो तर कुणाला थंडीत. हाच तर प्रकृतीचा खेळ आहे.
आपल्या ऋषींनी माणसाच्या स्वभावाचे निसर्गानुसार तीन प्रकार केले आहेत. वात, पित्त आणि कफ. यांनाच प्रवृत्ती असेही म्हणतात.
थोडक्यात सांगायचे तर वात म्हणजे वारा. म्हणजे हालचाल, उत्साह . पण तोच वात बिघडला तर चिंता, कोरडेपणा, दुखणे सुरू होते.पित्त म्हणजे अग्नी. पचन, तेज, बुद्धी. पण पित्त बिघडले तर राग, जळजळ, अॅसिडिटी निर्माण होते.कफ म्हणजे पाणी. पृथ्वी म्हणजे स्थिरता, ताकद, प्रेम. पण कफ बिघडला तर जडपणा, आळस, लठ्ठपणा येतो.आपल्या प्रत्येकात हे तिन्ही आहेत . पण एक वरचढ असतो. तीच आपली प्रकृती ठरते. तीच आपली ओळख होते. आपली प्रकृती कळली की आपल्याला काय खावे, काय खावू नये, कसे झोपावे, कोणता व्यायाम करावा हे आपोआप कळते. औषधाची गरजच पडत नाही.ही केवळ माहिती नाही तर ही एक आरोग्य शाळा असेल.
या माझ्या लेखात भारी-भारी संस्कृत शब्द नाहीत, किचकट सल्ले नाहीत. रोजच्या स्वयंपाकघरातले उपाय, आपल्या आजीने सांगितलेले पण आपण विसरलेले शहाणपण. हे सारे असणार आहे.
माझा एकच उद्देश आहे की पुढच्या वर्षी याच दिवशी जेव्हा ही लेखमाला संपेल तेव्हा तुम्ही स्वतःच स्वतःचे डॉक्टर व्हाल.
तर मग भेटूया दर शुक्रवारी आरोग्यम् धनसंपदा या खास सदरात.



