रत्नागिरी

पैसा फंड इंग्लिश स्कूल जवळ शाळेत जाण्यासाठी विद्यार्थ्यांना दररोज तुडवावा लागतोय चिखल

बेजबाबदार ठेकेदार आणि अभियंते बेपत्ता; सेवा रस्ते बंद करुन विद्यार्थ्यांची केली गैरसोय

संगमेश्वर दि. ३१ ( प्रतिनिधी ):- मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाची कामे आणि त्याचा दर्जा हा संगमेश्वर परिसरात आता चेष्टेचा विषय होऊ लागला आहे. संगमेश्वर सोनवी चौकातील परिस्थिती अत्यंत दयनीय असताना आता पैसा फंड इंग्लिश स्कूल जवळ विद्यार्थ्यांना मुख्य सेवा रस्ते बेकायदेशीरपणे बंद ठेवल्याने चिखल तुडवत शाळेत प्रवेश करावा लागत आहे. याबाबत शाळा व्यवस्थापनासह संस्था आणि पालकाने तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली आहे.

संगमेश्वर येथील बस स्थानक आणि सोनवी चौकात सर्वत्र चिखलाचे साम्राज्य पसरले आहे. वयोवृद्ध मंडळी, महिलावर्ग, विद्यार्थी यांना दररोज हा चिखल तुडवतच बस स्थानकात आणि बाजारपेठेत जावे लागते. याबाबत वारंवार नाराजी व्यक्त करूनही ठेकेदार अथवा राष्ट्रीय महामार्ग विभाग हा चिखल दूर करण्याकडे लक्ष देत नाही. या पाठोपाठच ठेकेदाराच्या आणखी एका धक्कादायक कारभाराचा नमुना पैसा फंड इंग्लिश स्कूल जवळ उड्डाण पुलाच्या दुतर्फा पाहायला मिळत आहे.

व्यापारी पैसा फंड संस्थेच्या पैसा फंड इंग्लिश स्कूल मध्ये येणारे विद्यार्थी सुरक्षित प्रशालेत यावेत म्हणून या ठिकाणी उड्डाणपुलाची उभारणी केली गेली. मात्र सद्यस्थितीत विद्यार्थ्यांना प्रशालेत येताना दोन्ही बाजूने असणाऱ्या सेवा रस्त्यांचा कोणताही उपयोग होत नसल्याची धक्कादायक बाब पुढे आली आहे. दोन्ही बाजूच्या सेवा रस्त्यावर प्रचंड माती खडी याचे डोंगर करून ठेवले आहेत. जाखमाता मंदिराजवळील एकमेव सेवा रस्ता सध्या सुरू असून या सेवा रस्त्यावरून ठेकेदाराची आवजड वाहने धावत असल्यामुळे येथे ढोपरभर चिखल झाला आहे. शाळेत जाताना विद्यार्थ्यांना हा चिखल तुडवतच शाळेत जावे लागत आहे.

संबंधित ठेकेदार आणि राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या अधिकाऱ्यांनी तातडीने हे सेवा रस्ते खुले करून चिखल दूर केला नाही तर , विद्यार्थ्यांना घेऊन याच ठिकाणी आंदोलन उभारण्याची तयारी संस्था शाळा व्यवस्थापनाने आणि पालक वर्गाने केली आहे. सेवा रस्ते उन्हाळ्यात पूर्ण करणे गरजेचे असताना ठेकेदाराने केवळ उड्डाणपूलावरच लक्ष दिले. परिणामी सध्या मुलांना राष्ट्रीय महामार्ग ओलांडूनच शाळेत जावे आणि यावे लागत आहे. असे करत असताना एखादी दुर्घटना घडल्यास याला जबाबदार कोण? असा सवाल शाळा व्यवस्थापन आणि पालक वर्गाने उपस्थित केला आहे.

लोकप्रतिनिधी, राष्ट्रीय महामार्ग विभागाचे अधिकारी, संबंधित अडचणीकडे दुर्लक्ष करणारे अभियंते, ठेकेदार यांनी पैसा फंड इंग्लिश स्कूल जवळ विद्यार्थ्यांसाठी सुरक्षित मार्ग उपलब्ध करून दिला नाही तर केंद्रीय रस्ते विकास मंत्र्यांना तातडीने निवेदन पाठविण्यात येणार असल्याची माहिती शाळा व्यवस्थापनाने दिली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button