राष्ट्ररक्षणासाठी रत्नागिरीत संविधान सन्मान मंचाची मूक पदयात्रा
हजारो नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग

रत्नागिरी दि. ३१ जुलै : संविधान सन्मान मंच, रत्नागिरी यांच्या वतीने देशाच्या सुरक्षिततेशी संबंधित गंभीर प्रश्नांबाबत जनजागृती करण्यासाठी गुरुवारी राष्ट्ररक्षण मूक पदयात्रेचे आयोजन करण्यात आले. शांततापूर्ण आणि लोकशाही मार्गाने राष्ट्रहित, संविधानाचा सन्मान तसेच सामाजिक ऐक्याचा संदेश देण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या या पदयात्रेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
छत्रपती शिवाजी महाराज पुतळा (मारुती मंदिर) येथून या मूक पदयात्रेला प्रारंभ झाला. त्यानंतर शहरातील प्रमुख मार्गांवरून मार्गक्रमण करत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, सिव्हिल हॉस्पिटल, रत्नागिरी येथे पदयात्रेची सांगता झाली.
या पदयात्रेत भाजपचे दक्षिण रत्नागिरी जिल्हाध्यक्ष प्रशांत यादव, उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष सतीश मोरे यांच्यासह भाजपचे आजी-माजी पदाधिकारी, कार्यकर्ते, युवक, युवती, विद्यार्थी तसेच हजारो देशप्रेमी नागरिक सहभागी झाले.
देशाच्या सुरक्षिततेला बाधा पोहोचविणाऱ्या कृत्यांचा निषेध, संविधानाचा सन्मान, राष्ट्रहित आणि सामाजिक सलोखा कायम राखण्याचा संदेश या मूक पदयात्रेद्वारे देण्यात आला. शांतता, लोकशाही मूल्ये आणि राष्ट्रीय एकात्मतेचा पुरस्कार करत नागरिकांनी या उपक्रमात सहभाग नोंदविला.
यावेळी बोलताना भाजपचे दक्षिण रत्नागिरी जिल्हाध्यक्ष प्रशांत यादव म्हणाले की, कोणत्याही राष्ट्रीय परीक्षेत पारदर्शकता, निष्पक्षता आणि कायद्याचे राज्य ही मूलभूत तत्त्वे आहेत. कुठे त्रुटी आढळल्यास त्या पुराव्यांच्या आधारे, कायदेशीर मार्गाने आणि संस्थात्मक चौकशीद्वारे सोडविणे आवश्यक आहे. मात्र काहीजण तरुणांच्या मनात संभ्रम निर्माण करून नकळत देशविरोधी शक्तींना मदत करत आहेत. अशा प्रकारच्या बेजबाबदार कृतींचा आम्ही ठाम निषेध करतो. देशात अराजकता निर्माण करण्याचा प्रयत्न हा देशाच्या व्यवस्थेवरील विश्वासावर थेट हल्ला असून अशा प्रवृत्तीला समाजाने वेळीच रोखले पाहिजे, असेही त्यांनी स्पष्ट केले.


