रत्नागिरी

जी. जी. पी. एस. शाळेत रक्षाबंधन उत्साहपूर्ण वातावरणात

विद्यार्थ्यांकडून पोलीस आणि संस्था पदाधिकाऱ्यांना रक्षासूत्र

रत्नागिरी दि. २८ ऑगस्ट :- जी. जी. पी. एस. (GGPS) शाळेत रक्षाबंधनाचा सण अत्यंत उत्साहपूर्ण आणि अनोख्या पद्धतीने साजरा करण्यात आला. शाळेच्या मुख्याध्यापिका सौ सोनाली पाटणकर तसेच प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका सौ अपूर्वा मूरकर यांच्या मार्गदर्शनाखाली केवळ वर्गापुरते मर्यादित न राहता, समाजाचे रक्षक असणारे पोलीस अधिकारी आणि संस्थेचे मार्गदर्शक यांच्यासोबत हा आनंद द्विगुणित करण्यात आला.

शाळेतील विद्यार्थी प्रतिनिधींनी शहर पोलीस स्थानकाला भेट देऊन तेथील पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना राखी बांधली. रात्रंदिवस नागरिकांच्या आणि शहराच्या सुरक्षेसाठी तत्पर असणाऱ्या पोलीस दादा आणि ताईंना रक्षासूत्र बांधून विद्यार्थ्यांनी त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. या वेळी विद्यार्थ्यां सोबत शाळेतील जेष्ठ शिक्षिका सौ. शिल्पा प्रभू आणि योगेश केतकर उपस्थित होते. तसेच

विद्यार्थी प्रतिनिधींनी संस्थेच्या मुख्य कार्यालयाला भेट दिली. तेथे उपस्थित असलेले संस्थेचे पदाधिकारी, विश्वस्त आणि कर्मचाऱ्यांना राखी बांधून सणाचा आनंद साजरा केला. विद्यार्थ्यांना घडवण्यात आणि शाळेच्या प्रगतीत मोलाचा वाटा असणाऱ्या या मार्गदर्शकांप्रती विद्यार्थ्यांनी आदर व्यक्त केला. यावेळी शाळेतील सौ. श्रद्धा जोशी या विद्यार्थ्यांसोबत उपस्थित होत्या. संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी सर्व विद्यार्थ्यांना त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आशीर्वाद दिले.

शाळा आवारातही विशेष असे पर्यावरणाची जपणूक करण्यासाठी व विद्यार्थ्यांना पर्यावरणाचे महत्त्व समजावे यासाठी झाडांना राखी बांधली गेली. प्रसंगी शाळेच्या प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका सौ. अपूर्वा मूरकर आणि सौ. अपर्णा जमादार उपस्थित होत्या. त्याच बरोबर शाळेतील शिक्षकेतर कर्मचारी आणि रिक्षा व वॅन चालक यांनाही राखी बांधण्यात आली.

समाजातील विविध घटकांशी जोडले जाणे आणि सामाजिक जाणिवेची रुजवण होणे, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता. संस्थेच्या कार्याध्यक्ष श्रीमती शिल्पाताई पटवर्धन, सचिव सतीश शेवडे शाळा समिती अध्यक्ष मंदार गाडगीळ, प्राथमिक विभागाचे शाळा समिती अध्यक्ष सुहास भाऊ पटवर्धन यांनी या उपक्रमाचे विशेष कौतुक केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button