रत्नागिरी

पैसा फंडमध्ये स्थिर चित्राचे प्रात्यक्षिक

चित्रकार विष्णू परीट यांच्या कुंचल्याची कमाल; कलावर्गातील विद्यार्थी भारावले

संगमेश्वर दि . १५ ( प्रतिनिधी ):- व्यापारी पैसा फंड संस्था संचलित पैसा फंड इंग्लिश स्कूलच्या कला विभागातर्फे जलरंग चित्रकार विष्णू परीट यांनी शासकीय रेखाकला परीक्षेसाठी बसलेल्या विद्यार्थ्यांना प्रशालेच्या कला वर्गात आज स्थिर चित्राचे प्रात्यक्षिक करुन दाखविले. जवळपास दोन तासांच्या या जलरंग प्रात्यक्षिका दरम्यान विद्यार्थ्यांनी उपस्थित केलेल्या विविध शंकाचे चित्रकार परीट सर यांनी योग्य प्रकारे निरसन केलं.

चित्रकार विष्णू परीट हे माध्यमिक विद्या मंदीर सोनवडे येथून कला शिक्षक म्हणून सेवानिवृत्त झाले आहेत. जलरंगांवर त्यांचे प्रभुत्व आहे. उत्कृष्ट निसर्ग चित्रकार म्हणून त्यांचा नांवलौकिक आहे. दररोज एक निसर्ग चित्र रेखाटून त्यांचा सराव सुरु असतो. सोनवडे सारख्या ग्रामीण भागात राहूनही त्यांनी आपल्या कला कौशल्याच्या जोरावर गावाचे नांव सर्वदूर पोहचवले. कला क्षेत्रात चित्रकार विष्णू परीट यांचे नांव आदराने घेतलं जातं.

शासकीय रेखाकला परीक्षेत विद्यार्थ्यांना स्थिर चित्र आणि स्मरणचित्र हे विषय काहीसे कठीण जातात यामुळे पैसा फंडच्या कला विभागातर्फे या दोन विषयांच्या सरावावर सर्वाधिक भर दिला जातो. कलावर्गात १ जुलै पासून रेखाकला परीक्षेसाठी जादा तास सुरु झाले आहेत. कला विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिक दाखवल्यास त्यांचा आत्मविश्वास वाढतो यासाठी आज स्थिर चित्र विषयाचे प्रात्यक्षिक चित्रकार विष्णू परीट यांनी दाखविले आणि विद्यार्थ्यांनी उपस्थित केलेल्या शंकांचे निरसन केले. रेखाटन कसे करावे, ते करताना कोणती काळजी घ्यावी? जलरंगात काम करताना कोणती काळजी घ्यावी, याबाबत परीट सर यांनी सखोल मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांना प्रशालेत येवून प्रात्यक्षिक दाखविल्याबद्दल संस्था सचिव धनंजय शेट्ये , मुख्याध्यापक सचिनदेव खामकर, पर्यवेक्षक प्रकाश दळवी आणि प्रशालेच्या कला विभागातर्फे विष्णू परीट सर यांचे आभार मानण्यात आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button