
गणपतीपुळे दि. १५ जुलै (वैभव पवार) :- देवरुख येथे दिनांक 10 ,11 व 12 जुलै रोजी जिल्हा अजिंक्यपद तायक्वांडो क्युरोगी आणि पुमसे स्पर्धा घेण्यात आल्या. या स्पर्धांमध्ये यंदाच्या वर्षी पहिल्यांदाच खंडाळा इंग्लिश मिडीयम स्कुलचे विद्यार्थी सहभागी झाले होते. परंतु या शाळेच्या सहभागी विद्यार्थ्यांनी पहिल्याच वर्षी आपली चमकदार कामगिरी दाखवत रौप्य,कास्य व सुवर्णपदकांची लयलूट केली. मागील मार्च महिन्यात येथील शाळेत तायक्वांडो प्रशिक्षण वर्ग सुरू झाले . त्यानंतर प्रशिक्षणात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांचे विशेष म्हणजे केवळ चार महिन्यात या शाळेतील विद्यार्थ्यांनी हे दिमाखदार यश संपादन केले आहे.
या स्पर्धेत शाळेतून एकूण १३ विद्यार्थी सहभागी झाले होते. त्यापैकी अमृता जोशी (सुवर्ण पदक), स्वरा काळे, राजवर्धन कल्याणकर, चिन्मय जाधव यांना रौप्य पदक मिळाले. तर परी हळदणकर, रुद्र राजवाडकर यांचे कांस्य पदक थोडक्यात हुकल्याने त्यांना चौथ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. स्पर्धेत रिया साठे, कनक घावरे, त्रिशा कदम, स्मित वाघमारे, स्मित नरळकर, पवन चौघुले, आयुष जंगम हे विद्यार्थी देखील सहभागी झाले होते.
सर्व विद्यार्थ्यांना मालगुंड तायक्वांडो क्लबचे मुख्य प्रशिक्षक रुपेश तावडे आणि शालेय शिक्षक हेरंब प्रसाद भिडे यांचे मार्गदर्शन लाभले.
सर्व यशस्वी आणि सहभागी विद्यार्थ्यांचे संस्था अध्यक्ष डॉ. मधुसूदन वैद्य, शालेय शिक्षण समिती अध्यक्ष बाळ जोग, मुख्याध्यापक आशिष वासावे सर यांनी अभिनंदन करून उज्ज्वल भविष्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच संपूर्ण खंडाळा परिसरातील पालक व ग्रामस्थांमधून यशस्वी विद्यार्थ्यांचे विशेष कौतुक व अभिनंदन होत आहे.



