कला क्षेत्रात प्रवेश करण्यासाठी कठोर परिश्रमांची गरज; अनेक क्षेत्रात कलाविष्काराची संधी

संगमेश्वर दि. ३ ( प्रतिनिधी ):- कला क्षेत्राची व्याप्ती खूप मोठी आहे. या क्षेत्रात स्वतःच्या प्रगतीसाठी अनेक वाटा आहेत. यातील कोणतीही वाट तुम्ही निवडलीत तरी, यासाठी कठोर परिश्रम घेण्याची तयारी असली पाहिजे . कलाकाराने काम करताना स्वतःची स्वतंत्र शैली निर्माण केली तर, त्याला कलाक्षेत्रात एक वेगळी ओळख प्राप्त होते. कलेची आवड असणाऱ्या विद्यार्थ्यांनी कला क्षेत्रात करियर करण्यासाठी आत्मविश्वासाने पुढे यावे, असं आवाहन युवा चित्रकार मनाली प्रदीप सैतवडेकर यांनी केलं.
व्यापारी पैसा फंड संस्थेच्या पैसा फंड इंग्लिश स्कुल मध्ये कला विभागा मार्फत ” कला प्रवासाच्या वाटा ” या विषयावर मनाली प्रदीप सैतवडेकर या युवा चित्रकर्त्रीचे मार्गदर्शन आयोजित करण्यात आले होते. यावेळी व्यासपीठावर प्रशालेचे मुख्याध्यापक सचिनदेव खामकर हे उपस्थित होते. यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना मुख्याध्यापक सचिनदेव खामकर म्हणाले की, व्यापारी पैसा फंड संस्था नेहमीच कला विषयाला प्रोत्साहन देत आली आहे. संस्थेने कला क्षेत्रासाठी स्वतंत्र चित्रदालन आणि कला वर्गाची उभारणी केली असल्याने राज्याच्या विविध भागातील कलारसिक पैसा फंड कलादालन पहाण्यासाठी येत असतात. विद्यार्थ्यांनी कठोर मेहनत घेतल्यास यश दूर राहू शकत नाही. मनाली सैतवडेकर ही प्रशालेची विद्यार्थिनी एक यशस्वी कलाकार बनल्याचा संस्था आणि प्रशालेला नक्कीच अभिमान आहे असे खामकर यांनी नमूद केले.
मनाली सैतवडेकर ही पैसा फंड इंग्लिश स्कुलची माजी विद्यार्थीनी आहे. तीने दहावी नंतर सांगली येथील कला विश्व महाविद्यालयात रंग आणि रेखाकला या विषयात डिप्लोमा प्राप्त केला. शिक्षण पूर्ण झाल्यावर मनालीने कलाक्षेत्रात स्वतंत्रपणे काम सुरु केलं. या क्षेत्रात काम सुरु कारण्यापूर्वी तीने उपनिषदांचा आणि अन्य विविध विषयांवर वाचन सुरु केलं आणि स्वतःची स्वतंत्र शैली निर्माण केली. प्रशालेप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी मनालीने प्रशालेत येवून विद्यार्थ्यांना कला प्रवासाच्या वाटा या विषयावर मार्गदर्शन केलं.
विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना मनालीने सहज सोप्या भाषेत विद्यार्थ्यांजवळ दुहेरी संवाद साधला आणि विद्यार्थ्यांना बोलतं केलं. प्रश्नोत्तराच्या रूपाने या मार्गदर्शन कार्यक्रमात अधिक रंगत आली. कलाकार हा संवेदनशील असायला हवा. कलाकार हा प्रथम चांगला माणूस बनला पाहिजे, म्हणजे नंतर तो आपोआप उत्तम कलाकार बनू शकतो. विद्यार्थ्यांनी उत्तमोत्तम कलाकृती साकारण्यासाठी वाचन करायला पाहिजे. कठोर मेहनत घेतल्यास उत्तम कलाकार बनणं नक्कीच अवघड नाही असे अखेरीस मनालीने स्पष्ट केले. यावेळी विद्यार्थ्यानी उपस्थित केलेल्या शंकांचे मनालीने सहज सोप्या पद्धतीने निरसन केले.



