रत्नागिरी

रस्त्याचे काँक्रिटीकरण झाले, पाण्याच्या निचऱ्याची सोयच नाही!

गणपतीपुळ्यात पावसाचे पाणी दुकानांमध्ये; व्यवसायिक आणि पर्यटक त्रस्त!

गणपतीपुळे दि. ३ (वैभव पवार) :-  प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आणि पर्यटन स्थळ असलेल्या श्रीक्षेत्र गणपतीपुळे येथे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अनास्थेमुळे स्थानिक व्यावसायिक आणि पर्यटकांना मोठ्या समस्येला सामोरे जावे लागत आहे. पर्यटन विकास आराखड्यांतर्गत झालेल्या रस्त्याच्या काँक्रीटीकरणानंतर पाण्याच्या निचऱ्यासाठी पाईप न टाकल्याने पावसाचे पाणी थेट दुकानांमध्ये आणि मुख्य रस्त्यावर साचू लागले आहे.

या गंभीर समस्येकडे लक्ष वेधण्यासाठी ग्रामपंचायत गणपतीपुळे यांनी सार्वजनिक बांधकाम उपविभागाच्या उपअभियंत्यांना १२ जून २०२६ रोजी थेट पत्र लिहून तातडीने कार्यवाही करण्याची मागणी केली आहे.

नेमकी काय आहे समस्या?

श्रीक्षेत्र गणपतीपुळे विकास आराखड्यांतर्गत ‘आपटा तिठा ते शासकीय विश्रामगृह’ या रस्त्याचे काँक्रीटीकरण करण्यात आले आहे. या कामादरम्यान पावसाळी पाणी वाहून जाण्यासाठी जागा (गटार/मार्ग) सोडण्यात आली खरी, परंतु त्या जागेत पाणी पुढे वाहून जाण्यासाठी अजूनही पाईप टाकण्यात आलेले नाहीत!

परिणाम आणि धोके:

*स्टॉलधारकांचे नुकसान* : सध्या पाऊस सुरू झाला असून, पाईपअभावी पाणी वाहून न जाता जागच्या जागी साचत आहे. हे साचलेले पाणी थेट रस्त्या कडेला असलेल्या स्टॉल आणि दुकानांमध्ये घुसत असल्याने व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे.

मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यावर *पाणी साचणार:* सध्या पावसाचा जोर अधून मधून कमी आहे, परंतु पाऊस मोठ्या प्रमाणात वाढल्यास हे पाणी श्रींच्या मंदिराकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर साचेल आणि रस्त्यावरून वाहू लागेल.

पर्यटकांना मनस्ताप: देशभरातून गणपतीपुळे येथे येणाऱ्या हजारो पर्यटकांना या साचलेल्या घाण पाण्यातून वाट काढावी लागणार असून, त्यांना नाहक मनस्ताप सहन करावा लागणार आहे.

ग्रामपंचायतीचा इशारा: ‘तातडीने पाईप टाका, अन्यथा…’

“सध्या पावसाचा ओघ कमी असतानाच सार्वजनिक बांधकाम विभागाने या ठिकाणी तातडीने पाईप टाकणे गरजेचे आहे. जर वेळेत पाईप टाकले नाहीत, तर पाऊस वाढल्यावर परिस्थिती हाताबाहेर जाईल. याचा नाहक त्रास स्थानिक स्टॉलधारक व पर्यटकांना सहन करावा लागेल. त्यामुळे विभागाने याची तात्काळ दखल घेऊन तातडीने काम पूर्ण करावे,” अशी आग्रही मागणी ग्रामपंचायत प्रशासकांनी पत्राद्वारे केली आहे.

आता या पत्रावर सार्वजनिक बांधकाम विभाग झोपेतून जागा होऊन तातडीने पाईप टाकणार की पर्यटकांना आणि स्थानिकांना पाण्यात तुंबून राहावे लागणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button