रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाची गोवंशीय हत्या व अवैध गोवंशीय वाहतूक विरोधात विशेष मोहीम
जिल्हास्तरावर चार विशेष भरारी पथकांची स्थापना; मकोकाअंतर्गत होणार कारवाई

रत्नागिरी दि. १ :- रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाची गोवंशीय हत्या व अवैध गोवंशीय वाहतूक विरोधात विशेष मोहीम राबविली जाणार असून, यासाठी पोलिसांची ४ भरारी पथकांची स्थापना करण्यात आली आहे.
पोलीस अधीक्षक, रत्नागिरी श्री. नितीन दत्तात्रय बगाटे यांच्या मार्गदर्शनाखाली रत्नागिरी जिल्ह्यात गोवंशीय हत्या, गोवंशीय अवैध वाहतूक, गोवंशीय अवैध मांस विक्री तसेच संबंधित बेकायदेशीर कृत्यांना प्रभावी आळा घालण्यासाठी महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम, 1976, प्राण्यांना निर्दयपणे वागविण्यास प्रतिबंध अधिनियम, 1960 तसेच महाराष्ट्र प्राणी संरक्षण (सुधारणा) अधिनियम, 1995 अंतर्गत रत्नागिरी जिल्हा पोलीस दलामार्फत विशेष प्रतिबंधात्मक मोहीम राबविण्यात येत आहे.
पोलीस अधीक्षक, रत्नागिरी श्री. नितीन दत्तात्रय बगाटे यांनी जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांना संबंधित कायद्यांची काटेकोर अंमलबजावणी करण्याच्या सक्त सूचना दिल्या आहेत. त्यानुसार दिनांक 23 मे 2026 पासून जिल्हास्तरावर चार विशेष भरारी पथकांची स्थापना करण्यात आली असून ही पथके एकूण ४ पोलीस उपविभागांमध्ये कार्यरत आहेत.
या भरारी पथकांना गोवंशीय अवैध वाहतूक, गोवंशीय हत्या, तस्करी, गोवंशीय अवैध मांस विक्री तसेच संबंधित बेकायदेशीर कृत्यांची माहिती मिळताच तात्काळ छापे टाकून कठोर कायदेशीर कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. जिल्ह्यातील प्रत्येक पोलीस उपविभागासाठी स्वतंत्र कार्यक्षेत्र निश्चित करण्यात आले असून त्यानुसार सातत्याने गस्त व तपासणी मोहिम राबविण्यात येत आहेत.
पोलीस अधीक्षक, रत्नागिरी श्री. नितीन दत्तात्रय बगाटे यांनी गोवंशीय तस्करीमध्ये वारंवार सहभागी होणाऱ्या व्यक्ती अथवा संघटित टोळ्यांविरुद्ध कठोर कायदेशीर कारवाई करण्याचा तसेच संघटित स्वरुपात अशा गुन्ह्यांमध्ये सहभागी असणाऱ्यांविरुद्ध महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम, 1999 (म.को. का.) अंतर्गत कारवाई करण्याचा इशाराही दिला आहे.
या विशेष मोहिमेचे नोडल अधिकारी म्हणून पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, रत्नागिरी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच गावपातळीवर प्रभावी माहिती संकलन व प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासाठी जिल्ह्यातील सर्व पोलीस पाटील यांचीही नोडल (समन्वयक) म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
रत्नागिरी जिल्हा पोलीस दलातर्फे सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की, गोवंशीय अवैध वाहतूक, गोवंशीय हत्या किंवा अशा प्रकारच्या कोणत्याही बेकायदेशीर कृत्याची माहिती मिळाल्यास संबंधित नोडल अधिकारी, भरारी पथकातील पोलीस अधिकारी अथवा डायल 112 या आपत्कालीन हेल्पलाईनवर किंवा थेट पोलीस अधीक्षक, रत्नागिरी श्री. नितीन दत्तात्रय बगाटे यांच्या 8857848157 या मोबाईल क्रमांकावर तात्काळ संपर्क करून या मोहिमेत नागरिकांनी सक्रिय सहकार्य करावे. तसेच माहिती देणाऱ्या नागरिकांची ओळख गोपनीय ठेवण्यात येईल.
विशेष मोहिम नोडल अधिकारी यांचे नाव व संपर्क क्रमांक : स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, रत्नागिरी, पोलीस निरीक्षक, श्री. नितीन ढेरे (मो.नं. 9011995777)
भरारी पथक-
पोलीस अधिकारी नाव व संपर्क क्रमांक
भरारी पथक क्रमांक 1 : पो.उनि श्री. श्रीकृष्ण येवले (मो. ८७७९६४५०९१) कार्यक्षेत्र – खेड उपविभाग
भरारी पथक क्रमांक 2 : पो.उनि श्री. ओम आघाव (मो.नं. 7776059378) चिपळूण, कार्यक्षेत्र -चिपळूण उपविभाग
भरारी पथक क्रमांक 3 : पो.उनि श्री. सागर शिंदे (मो. नंबर. ९०२८३८९४५) , रत्नागिरी कार्यक्षेत्र – रत्नागिरी उपविभाग
भरारी पथक क्रमांक 4 : पोउपनि सुधीर उबाळे (मो.नं. 7350028482), राजापूर कार्यक्षेत्र – लांजा उपविभाग
नोडल (समन्वयक) रत्नागिरी जिल्हयातील सर्व पोलीस पाटील.



