वाटद खंडाळा प्राथमिक आरोग्य केंद्राची इमारत अत्यंत धोकादायक; आठ दिवसांत स्थलांतर न केल्यास आंदोलनाचा इशारा
'खंडाळा पंचक्रोशी सामाजिक संस्थे'चे अध्यक्ष प्रथमेश गोपाळ गावणकर यांचे जि. प. ला निवेदन

गणपतीपुळे दि. १ (वैभव पवार) :- रत्नागिरी तालुक्यातील वाटद खंडाळा येथील प्राथमिक आरोग्य केंद्राची इमारत अत्यंत नादुरुस्त आणि धोकादायक झाली असून, येथे कधीही मोठी दुर्घटना घडण्याची भीती निर्माण झाली आहे. प्रशासनाच्या या दुर्लक्षित धोरणाविरोधात ‘खंडाळा पंचक्रोशी सामाजिक संस्थे’चे अध्यक्ष प्रथमेश गोपाळ गावणकर यांनी रत्नागिरी जिल्हा परिषद अध्यक्षांना तसेच मुख्यकार्यकारी अधिकारी यांना निवेदन देवुन तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. पुढील आठ दिवसांत योग्य कारवाई न झाल्यास रस्त्यावर उतरून घटनात्मक पद्धतीने आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.
४० वर्षांपासून दुरुस्तीचा अभाव; कर्मचाऱ्यांना बसताहेत विजेचे धक्के
१९८६ साली सुरू झालेल्या या आरोग्य केंद्राच्या इमारतीची गेल्या ४० वर्षांत कोणतीही विशेष देखभाल किंवा दुरुस्ती झालेली नाही. पत्रात नमूद केल्यानुसार आरोग्य केंद्राची दुरवस्था खालीलप्रमाणे आहे:
कधीही कोसळणारे छत: इमारतीचा स्लॅब कधीही कोसळू शकतो आणि पिलर पूर्णपणे नादुरुस्त झाले आहेत.
पावसाचे पाणी आणि शॉर्ट सर्किट: भिंतींमधून पावसाचे पाणी पूर्णपणे आत येत असून छप्पर उडून गेले आहे. इलेक्ट्रिसिटी लाईनमध्ये पाणी जात असल्याने गेल्या दोन वर्षांत येथील कर्मचाऱ्यांना विजेचे धक्के (शॉक) लागल्याच्या घटना घडल्या आहेत.
सुविधांचा आणि डॉक्टरांचा मोठा तुटवडा
या परिसरात मोठ्या प्रमाणात इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट झाल्याने अपघातांचे प्रमाण वाढले आहे. दिवसाला १५० हून अधिक ओपीडी (OPD), १० हून अधिक आयपिडी (IPD) आणि महिन्यातून ९ हून अधिक डिलिव्हरी पेशंट येथे येतात. मात्र, त्या तुलनेत आरोग्य केंद्रात गंभीर कमतरता आहेत:
डॉक्टरांचा राजीनामा : कंत्राटी पद्धतीवरील दोन डॉक्टरांपैकी एका डॉक्टरने अनियमित वेतनामुळे राजीनामा दिला आहे. अनेक कर्मचारी पदे देखील रिक्त आहेत.
यंत्रणेची कमतरता : औद्योगिक क्षेत्र असूनही येथे एक्सरे, सोनोग्राफी सारखी कोणतीही तांत्रिक यंत्रणा नाही आणि अपघाताच्या वेळी रुग्णवाहिका (अॅम्बुलन्स) देखील उपलब्ध नसते.
प्रमुख मागण्या:
‘खंडाळा पंचक्रोशी सामाजिक संस्थे’ने प्रशासनासमोर दोन प्रमुख मागण्या ठेवल्या आहेत:
१) सुरक्षेच्या दृष्टीने हे प्राथमिक आरोग्य केंद्र तात्पुरत्या स्वरूपात दुसऱ्या इमारतीत स्थलांतरित करावे व नवीन इमारतीचे काम त्वरित सुरू करावे.
२) वाढती लोकसंख्या व इंडस्ट्रियल झोनचा विचार करून येथे किमान अद्ययावत यंत्रणा उभी करावी.
स्थानिक नागरिकांच्या आरोग्याशी व जीविताशी चाललेला हा खेळ थांबवून प्रशासनाने ८ दिवसांत निर्णय घ्यावा, अन्यथा समस्त नागरिकांना मूलभूत हक्कांसाठी रस्त्यावर उतरावे लागेल, असा स्पष्ट इशारा पत्राद्वारे देण्यात आला आहे.



