क्रीडारत्नागिरी

एसव्हीजेसीटी स्पोर्ट्स अकॅडमीत ‘ऑलिम्पिक क्रीडा सप्ताहा’चा उत्साहात समारोप

विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग

संगमेश्वर दि. ३० ( प्रतिनिधी ) :- आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक दिनाचे औचित्य साधून डेरवण येथील एसव्हीजेसीटी स्पोर्ट्स अकॅडमीमध्ये आयोजित करण्यात आलेल्या विशेष ‘ऑलिम्पिक क्रीडा सप्ताहा’ला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या सप्ताहाच्या माध्यमातून निरोगी जीवनशैली आणि क्रीडा संस्कृतीचा जागर करण्यात आला.

या उपक्रमात एसव्हीजेसीटी स्पोर्ट्स अकॅडमीच्या शालेय विद्यार्थ्यांसोबतच वालावलकर नर्सिंग, फिजिओथेरपी आणि वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनीही मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला. आठवडाभर चाललेल्या या उपक्रमात शारीरिक तंदुरुस्ती, संघभावना आणि शिस्तीचा संदेश देणाऱ्या विविध खेळांचे आयोजन करण्यात आले होते.

या क्रीडा सप्ताहाचे मुख्य आकर्षण सामूहिक सूर्यनमस्कार योग आणि भारतीय संस्कृतीतील आरोग्याच्या परंपरेचा प्रसार, फन शूटिंग मध्ये विद्यार्थ्यांमध्ये एकाग्रता, संयम आणि अचूक लक्ष्य साधण्याची वृत्ती विकसित झाली. तसेच बॅडमिंटन आणि टेबल टेनिस या स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांनी आपल्या खेळातील कौशल्ये आणि स्पर्धात्मक वृत्तीचे दर्शन घडवले. याच दरम्यान  ग्रुप स्विमिंग यामध्ये जलतरण उपक्रमातून शारीरिक तंदुरुस्तीसोबतच जलसुरक्षेचे महत्त्व पटवून देण्यात आले.

हा क्रीडा सप्ताह यशस्वी करण्यासाठी एसव्हीजेसीटी स्पोर्ट्स अकॅडमीच्या क्रीडा विभागाने विशेष मेहनत घेतली. अकॅडमीचे प्रशिक्षक विनायक पवार, प्रतीक्षा पेंढारी, सागर साळवी आणि अविनाश पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व उपक्रम शिस्तबद्धरीत्या पार पडले.

सर्वांगीण विकासासाठी क्रीडाक्षेत्र महत्त्वाचे

कार्यक्रमाचे महत्त्व सांगताना अकॅडमीचे क्रीडा संचालक श्रीकांत पराडकर म्हणाले, “ऑलिम्पिक चळवळ ही केवळ खेळापुरती मर्यादित नसून, ती निरोगी, सक्षम आणि जबाबदार समाजाची निर्मिती करण्याचे साधन आहे. विद्यार्थ्यांनी शिक्षणासोबतच क्रीडा क्षेत्रात नियमित सहभागी झाल्यास त्यांचा सर्वांगीण व्यक्तिमत्त्व विकास साध्य होण्यास मोठी मदत होईल.”

-श्रीकांत पराडकर

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button