
रत्नागिरी, दि. 30 : मुकुल माधव फाऊंडेशनने आपल्या सीएसआर भागीदार फिनोलेक्स इंडस्ट्रीज लिमिटेड यांच्या सहकार्याने आयोजित केलेले १८वे वार्षिक शालेय आरोग्य तपासणी शिबिर यशस्वीरीत्या पार पडले. २२ ते २७ जून या कालावधीत पावस-रत्नागिरी परिसरातील १३ शाळांमधील २,३५५ विद्यार्थ्यांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली.
सन २००८ पासून सुरू असलेला हा उपक्रम ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी सातत्याने राबविण्यात येत आहे. दरवर्षी या उपक्रमातून ५,००० हून अधिक विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करून आवश्यक वैद्यकीय मार्गदर्शन व पुढील उपचारासाठी सल्ला दिला जातो.
या शिबिरात पुणे, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी येथील अनुभवी डॉक्टरांनी सहभाग घेतला. ससून रुग्णालय, सिंबायोसिस मेडिकल कॉलेज, एच. व्ही. देसाई आय हॉस्पिटल, सिंधुदुर्ग मेडिकल कॉलेज, परकार हॉस्पिटल, इन्फिगो आय हॉस्पिटल, देशपांडे डेंटल हॉस्पिटल आणि श्री डेंटल क्लिनिक येथील डॉक्टरांनी विद्यार्थ्यांची तपासणी केली.
बालरोग, नेत्ररोग, दंतचिकित्सा, त्वचारोग, कान-नाक-घसा (ईएनटी) आणि स्त्रीरोग तज्ज्ञांनी विद्यार्थ्यांची सविस्तर तपासणी करून आवश्यक त्या विद्यार्थ्यांना पुढील उपचारासाठी मार्गदर्शन केले.
यावर्षी प्रत्येक शाळेत किशोरवयीन मुलींसाठी मासिक पाळी आरोग्य व स्वच्छता जनजागृती सत्राचे आयोजन करण्यात आले. महिला स्त्रीरोगतज्ज्ञांनी मुलींना मासिक पाळीदरम्यान घ्यावयाची काळजी, स्वच्छता, योग्य आहार, आरोग्य आणि गैरसमजांबाबत मार्गदर्शन केले. मुलींनीही आपल्या शंकांचे निरसन करून घेतले.
शिबिराची संपूर्ण प्रक्रिया नियोजनबद्ध पद्धतीने राबविण्यात आली. विद्यार्थ्यांची नोंदणी, उंची-वजन मोजमाप, विविध तज्ज्ञ डॉक्टरांकडून तपासणी, आरोग्य नोंदी आणि प्रत्येक विद्यार्थ्याला हायजीन किट देण्यात आले.
शिबिरापूर्वी सहभागी शाळांमध्ये संमतीपत्रे घेण्यात आली. त्यानंतर फिनोलेक्स इंडस्ट्रीजचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अनुप करमरकर यांनी प्रत्येक शाळेत जाऊन आरोग्य, स्वच्छता आणि पोषण या विषयांवर जनजागृतीपर मार्गदर्शन केले. त्यामुळे विद्यार्थ्यांना आरोग्य तपासणीबाबत योग्य माहिती मिळाली.
ज्या विद्यार्थ्यांना पुढील उपचारांची गरज होती, त्यांच्यासाठी पालकांसह समुपदेशन सत्रांचे आयोजन करण्यात आले. डॉक्टरांनी पालकांना तपासणीचा अहवाल समजावून सांगून पुढील उपचाराबाबत मार्गदर्शन केले.
शिबिराद्वारे विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांमध्ये संतुलित आहार, वैयक्तिक स्वच्छता, प्रतिबंधात्मक आरोग्यसेवा आणि निरोगी जीवनशैली याविषयी जागरूकता निर्माण करण्यात आली. सर्व तपासण्या, वैद्यकीय सल्ला आणि समुपदेशन सेवा पूर्णपणे मोफत देण्यात आल्या.
मुकुल माधव फाऊंडेशनच्या व्यवस्थापकीय विश्वस्त सौ. रितू प्रकाश छाब्रिया यांच्या मार्गदर्शनाखाली गेली १८ वर्षे हा उपक्रम सातत्याने राबविण्यात येत आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली शिक्षण, आरोग्य आणि समाजविकास क्षेत्रात अनेक लोकाभिमुख उपक्रम राबविले जात असून हजारो विद्यार्थी व कुटुंबांना त्याचा लाभ झाला आहे.
गेल्या अठरा वर्षांत हे शालेय आरोग्य तपासणी शिबिर ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी एक आदर्श सामाजिक उपक्रम ठरले आहे. मुकुल माधव फाऊंडेशन आणि त्यांचे सीएसआर भागीदार फिनोलेक्स इंडस्ट्रीज लिमिटेड यांच्या सामाजिक बांधिलकीचे हे उत्तम उदाहरण असून विद्यार्थ्यांच्या निरोगी आणि उज्ज्वल भविष्यासाठी दोन्ही संस्था सातत्याने कार्यरत आहेत.



