रत्नागिरी

पुष्पदत्त इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये पालक सभा संपन्न

रत्नागिरी दि. २४ :- पुष्पदत्त इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये बुधवारी, १७ जून २०२६ रोजी नवीन शैक्षणिक वर्षातील पहिली शिक्षक-पालक सभा उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाली. मुख्याध्यापिका सौ. ईशा जगदीश गोताड यांच्या नेतृत्वाखाली आयोजित करण्यात आलेल्या या सभेला पालकांची मोठ्या संख्येने उपस्थिती लाभली.

कार्यक्रमास शाळेचे अध्यक्ष श्री. हेरंब साळवी, उपमुख्याध्यापिका सौ. श्रावस्ती सावंत तसेच शिक्षकवृंद उपस्थित होते. सभेचे सूत्रसंचालन सौ. अन्वी सुर्वे यांनी केले. प्रारंभी मान्यवरांचे स्वागत करण्यात आले.

उपमुख्याध्यापिका सौ. श्रावस्ती सावंत यांनी शैक्षणिक वर्ष २०२६-२७ मध्ये राबविण्यात येणाऱ्या विविध नवीन उपक्रमांची माहिती पालकांना दिली. तसेच शाळेच्या नवीन व्यवस्थापन समितीची स्थापना झाल्याची माहिती देऊन समिती सदस्यांचे स्वागत करण्यात आले.

मुख्याध्यापिका सौ. ईशा गोताड यांनी मागील शैक्षणिक वर्षातील दहावीच्या विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या यशाचा गौरव केला. आगामी शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शाळा कटिबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी कराटे प्रशिक्षक श्री. जावेद मिरकर यांनी विद्यार्थ्यांच्या आत्मसंरक्षण, शारीरिक तंदुरुस्ती व आत्मविश्वास वाढीसाठी कराटेचे महत्त्व स्पष्ट केले. सौ. विचारे मॅडम यांनी विद्यार्थ्यांच्या शारीरिक व मानसिक आरोग्यासाठी योगाचे महत्त्व पटवून दिले. तसेच सौ. आखाडे मॅडम यांनी विद्यार्थ्यांच्या कलागुणांच्या विकासासाठी नृत्याचे महत्त्व विशद केले.

सभेदरम्यान पालकांनी शाळेच्या कार्याबद्दल समाधान व्यक्त करत काही विधायक सूचना मांडल्या. सकारात्मक वातावरणात चर्चा होऊन सभेची यशस्वी सांगता झाली.

शेवटी सौ. अन्वी सुर्वे यांनी उपस्थितांचे आभार मानले. पालक, शिक्षक आणि शाळा व्यवस्थापन यांच्यातील संवाद अधिक दृढ करणारी ही सभा ठरली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button