चिपळूण सायकलिंग क्लबचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न

चिपळूण दि. २३ :- चिपळूण सायकलिंग क्लबचा वर्धापन दिन आणि वार्षिक स्नेहसंमेलन २१ जून रोजी मोठ्या उत्साहात संपन्न झाले. या कार्यक्रमात क्लबच्या विविध उपक्रमांचा आढावा घेण्यात आला तसेच सदस्यांच्या उल्लेखनीय कामगिरीचा गौरव करण्यात आला.
संमेलनादरम्यान क्लबच्या नूतन कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली. कार्यकारी मंडळात अध्यक्ष श्री. प्रशांत दाभोळकर, उपाध्यक्ष श्री. मनोज भाटवडेकर, श्री. प्रसाद आलेकर व सौ. निशा आंबेकर, सचिव प्रा.सौ. भारती टारे, सहसचिव श्री. स्वप्निल गायकवाड, खजिनदार श्री. योगेश ओसवाल तसेच सदस्य श्री. विक्रांत आलेकर आणि डॉ. सौ. मनिषा वाघमारे यांचा समावेश असल्याची माहिती देण्यात आली.उपस्थित सदस्यांनी नव्या कार्यकारिणीचे उत्स्फूर्त स्वागत केले.
यावेळी क्लबचा वार्षिक अहवाल तसेच आर्थिक अहवाल सादर करण्यात आला. मागील वर्षभरात सायकलिंग क्षेत्रात विविध स्तरांवर उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या एकूण २० सदस्यांचा सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. तसेच वर्षभरात सर्वाधिक सायकलिंग अंतर पूर्ण करणाऱ्या महिला व पुरुष गटातील पहिल्या पाच सदस्यांचा सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.
क्लबच्या उपक्रमांना सातत्याने दिशा देणारे ज्येष्ठ सायकलपटू श्री. श्रीराम दांडेकर यांना Influencer Award प्रदान करून सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. तसेच क्लबचा युवा सदस्य राघव खर्चे याने पुढाकार घेऊन चिपळूण सायकलिंग क्लबची वेबसाईट विकसित केल्याबद्दल त्याला Certificate of Appreciation देऊन विशेष सन्मान करण्यात आला.
मागील वर्षात क्लबचे सदस्यत्व स्वीकारून नियमित सायकलिंग करणाऱ्या महिला व पुरुष गटातील नवोदित सायकलपटूंचा सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
याशिवाय, शैक्षणिक क्षेत्रात विशेष प्राविण्य मिळविणाऱ्या क्लब सदस्यांच्या गुणवंत पाल्यांचाही गौरव करण्यात आला.
सायकलिंग क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी आणि क्लबसाठी दिलेल्या योगदानाची दखल घेत ‘सायकल रत्न २०२५’हा विशेष पुरस्कार प्रदान करण्यात आला. यामध्ये महिला गटातून सौ. ज्योती परांजपे तर पुरुष गटातून श्री. प्रसाद आलेकर यांना सन्मानपत्र व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.
मागील वर्षभरात सर्वाधिक सायकलिंग अंतर पूर्ण करणाऱ्या सदस्यांना ‘सायकल सम्राट’ आणि ‘सायकल सम्राज्ञी’ या किताबांनी सन्मानित करण्यात आले. यामध्ये वर्षभरात तब्बल २२,२२२ किलोमीटर सायकलिंग करणारे श्री. प्रशांत दाभोळकर यांना ‘सायकल सम्राट’ तर १०,२३९ किलोमीटर सायकलिंग करणाऱ्या डॉ. मनीषा वाघमारे यांना ‘सायकल सम्राज्ञी’ म्हणून सन्मानपत्र व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.
नूतन अध्यक्ष श्री. प्रशांत दाभोळकर यांनी आपल्या मनोगतात चिपळूण सायकलिंग क्लबच्या उत्तरोत्तर प्रगतीसाठी तसेच चिपळूण, राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर सायकलिंगचा प्रचार व प्रसार करण्यासाठी विविध नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्याचा मानस व्यक्त केला. अध्यक्षपदी एकमताने निवड केल्याबद्दल त्यांनी सर्व सदस्यांचे आभार मानले.
यानंतर क्लबसदस्या डॉ. आश्विनी गणपत्ये यांनी उपस्थित सदस्यांसाठी विविध मनोरंजक खेळ व फनी गेम्सचे आयोजन करून वातावरणात उत्साह आणि आनंद निर्माण केला. स्नेहभोजनाने वार्षिक स्नेहसंमेलनाची आनंददायी सांगता झाली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिव सौ. भारती तारे यांनी केले, तर उपाध्यक्ष श्री. मनोज भाटवडेकर यांनी आभार प्रदर्शन केले.
या स्नेहसंमेलनाने चिपळूण सायकलिंग क्लबमधील सायकलप्रेमी सदस्य, त्यांच्या कुटुंबीयांमधील स्नेहबंध अधिक दृढ करण्याबरोबरच सायकलिंग, आरोग्य, सामाजिक सहभाग आणि गुणवंतांचा गौरव या क्लबच्या मूल्यांना अधिक बळकटी दिली.



