
तरवळ दि. २१ (अमित जाधव) :- रत्नागिरी तालुक्यातील जि. प. पू. प्राथमिक शाळा रानपाट या शाळेचे माजी विद्यार्थी संतोष गोविंद गोनबरे यांनी आपल्या मुलाच्या वाढदिवसा प्रित्यर्थ शाळेतील विद्यार्थ्यांना मोफत शैक्षणिक साहित्याचे वाटप केले. तसेच आपल्या मुलाचा २५ वा वाढदिवस शाळेतील विद्यार्थ्यांसोबत साजरा केला.
संतोष गोविंद गोनबरे हे या शाळेचे माजी विद्यार्थी असून त्यांचे प्राथमिक शिक्षण याच शाळेत पूर्ण झाले असून सध्या ते माणगाव, जिल्हा रायगड येथे रेल्वेमध्ये नोकरी करतात. त्यांचे कुटुंब मुंबई डोंबिवली येथे वास्तव्यास आहे. राणपाट हे त्यांचे मूळगाव असल्यामुळे आपल्या गावाशी व आपल्या शाळेशी त्यांची नाळ कायम जोडलेली आहे. तसेच ते ज्या शाळेत शिकले त्या शाळेबद्दल त्यांना आत्मियता आहे.याच उदात्त हेतूने त्यांनी या शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना मोफत शैक्षणिक साहित्याचे वाटप केले व आपली कृतज्ञता व्यक्त केली.
विद्यार्थ्यांना पुरक शैक्षणिक साहित्य कंपास पेटी, पेन, पेन्सिल बॉक्स, स्केचपेन इत्यादी. आणि शिक्षकांना पेन वाटप केले.
आपल्या शाळेविषयी आदर राखून आपल्या मुलाचा वाढदिवस अशा पद्धतीने साजरा करणे ही गोष्ट सर्व माजी विद्यार्थ्यांना निश्चितच प्रेरणा देणारी आहे.
संतोष गोविंद गोनबरे यांचा मुलगा आशिष याच्या वाढदिवसा प्रसंगी त्याच्यासोबत संतोष गोविंद गोनबरे, त्यांची पत्नी अश्विनी संतोष गोनबरे, बहीण निशिगंधा आणि ओरी येथील संतोष अनंत पड्याळ हे उपस्थीत होते.
मुख्याध्यापक श्री. भितळे सर यांनी आशिष याला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत, त्याच्या सोबत आलेले त्याचे पालक आणि इतर सर्वांचे स्वागत करून शैक्षणिक साहित्य वाटपाबद्दल आभार व्यक्त केले.



