
मुंबई दि. २१ :- राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री ना. नितेश राणे यांनी येत्या २३ जून रोजी वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत एक्स पोस्ट वरुन ना. राणे यांनी ही माहिती दिली आहे.
आपल्या एक्स पोस्ट मध्ये मंत्री नितेश राणे यांनी असे म्हटले आहे की, कोकणातील आंबा आणि काजू पिकांचे झालेले अतोनात नुकसान, लांबलेल्या पावसाळ्यामुळे मच्छीमार बांधवांची झालेली परवड, राज्यभर एल-निनोच्या सावटामुळे निर्माण झालेली पाणीटंचाई आणि दुष्काळाचे गडद संकट या पार्श्वभूमीवर, यंदा दि. २३ जून रोजी माझा वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय मी घेतला आहे.
अशा कठीण काळात आनंदोत्सवापेक्षा उद्भवलेल्या परिस्थितीचे भान राखणे अधिक महत्त्वाचे आहे.
माझ्या सर्व हितचिंतक, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना विनंती आहे की, प्रत्यक्ष भेटायला न येता आपापल्या जिल्ह्यात ‘गो-सेवा’ करावी व विविध समाजपयोगी उपक्रम राबवावेत. हिंदुत्वाच्या संस्कारातून गौमातेची सेवा, गौसंवर्धनाच्या कार्यात सहभाग तसेच गरजूंना मदत आणि समाजहिताचे कार्य हेच खरे उत्सवाचे स्वरूप आहे.
तुमचा हा सेवाभाव हीच माझ्यासाठी लाखमोलाची सदिच्छा असेल…!!, असे ना. राणे यांनी या पोस्टमध्ये नमूद केले आहे.



