रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाची ‘लोक अदालत’मध्ये उल्लेखनीय कामगिरी; १०५ प्रकरणांचा यशस्वी निपटारा!

रत्नागिरी दि. २१ :- न्यायालयाबाहेर परस्पर सामंजस्याने आणि कायदेशीर संमतीने वाद मिटवण्याचे प्रभावी व्यासपीठ असलेल्या ‘लोक अदालत’मध्ये रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाने उल्लेखनीय यश संपादन केले आहे. दिनांक ०९ मे २०२६ रोजी जिल्हा स्तरावर स्थानिक विधी सेवा समित्यांमार्फत या लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले होते.
या मोहिमेत रत्नागिरी जिल्ह्यातील एकूण १८ पोलीस ठाण्यांमधील १६८ प्रकरणांना चर्चेसाठी ठेवण्यात आले होते. त्यापैकी पोलीस दलाने प्रभावी समन्वय, सातत्यपूर्ण पाठपुरावा आणि कायदेशीर प्रक्रियेची योग्य अंमलबजावणी करून तब्बल १०५ प्रकरणांमध्ये यशस्वीरित्या तडजोड व निकाली कार्यवाही करण्यात यश मिळवले आहे.
लोक अदालत: ‘ना हार, ना जीत… फक्त सुलभ न्याय!’
‘विधी सेवा प्राधिकरण कायदा, १९८७’ अंतर्गत कायदेशीर मान्यता असलेल्या या अदालतीचे अनेक फायदे नागरिकांना मिळाले आहेत:
वेळ आणि पैशांची मोठी बचत: न्यायालयीन प्रक्रियेत लागणारा मोठा वेळ आणि खर्च या माध्यमातून वाचतो.
मोफत व जलद न्याय: दोन्ही पक्षांच्या सहमतीने अत्यंत सुलभ, गतिमान आणि मोफत न्याय मिळवून दिला जातो.
परस्पर सामंजस्य : येथे तडजोड व समेटाच्या माध्यमातून वाद मिटवले जात असल्याने कोणत्याही पक्षाची हार किंवा जीत होत नाही. दोन्ही बाजूंच्या संमतीने सुवर्णमध्य काढला जातो.
अंतिम निर्णय: लोक अदालतीचा निर्णय हा अंतिम असतो आणि तो सर्व पक्षांवर बंधनकारक राहतो.
रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाच्या या यशस्वी कामगिरीमुळे अनेक प्रलंबित वादांवर पडदा पडला असून, नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.


