आंबा घाटात एसटी आणि एर्टिका कारची समोरासमोर धडक; ५ जण जखमी

संगमेश्वर दि. २१ :- तालुक्यातील रत्नागिरी-कोल्हापूर महामार्गावरील आंबा घाटात आज सकाळी एक भीषण अपघात झाला. घाटातील दक्खन बस थांब्याजवळ एसटी बस आणि एर्टिका कार यांच्यात झालेल्या समोरासमोर धडकेत ५ जण जखमी झाले आहेत. हा अपघात आज सकाळी ९:४० वाजण्याच्या सुमारास घडला.
मिळालेल्या माहितीनुसार, चालक प्रल्हाद भिकाजी शिंदे (वय ५०, रा. भडकंबा) हे आपल्या ताब्यातील एसटी बस (क्रमांक MH 14 BT 2753) घेऊन खडीकोळवण ते साखरपा अशी जात होते. दरम्यान, बस आंबा घाटातील दक्खन बस थांब्याजवळ आली असता, समोरून येणाऱ्या एर्टिका कारने (क्रमांक MH 11 DZ 0329) बसला समोरासमोर जोरदार धडक दिली. कारचालक संतोष शिवाजी पवार (वय ५०, रा. रामनगर, सातारा) हे आपल्या कारमधून रत्नागिरीहून साताऱ्याच्या दिशेने जात असताना हा अपघात झाला.
अपघातातील जखमींची नावे:
या अपघातामध्ये दोन्ही गाड्यांमधील एकूण ५ जण जखमी झाले आहेत:
१. प्रल्हाद भिकाजी शिंदे (वय ५०, रा. भडकंबा) – एसटी चालक
२. संजय तुकाराम शितप (वय ५८, रा. खाडिकोळवण) – एसटी प्रवासी
३. संतोष शिवाजी पवार (वय ५०, रा. रामनगर, सातारा) – एर्टिका चालक
४. शंभुराज शिवाजी पवार (वय १३, रा. रामनगर, सातारा) – कारमधील प्रवासी
५. श्रीकांत लक्ष्मण मानपुरी (वय २७, रा. भिवंडी, ठाणे) – कारमधील प्रवासी
अपघाताची माहिती मिळताच साखरपा पोलीस दूर क्षेत्राच्या कर्मचाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने जखमींना गाड्यांमधून सुखरूप बाहेर काढले. सर्व जखमींना तात्काळ साखरपा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
अपघातानंतर पोलिसांनी घटनास्थळावरील वाहने बाजूला करून महामार्गावरील वाहतूक पूर्ववत केली. याप्रकरणी साखरपा पोलिसांकडून पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे.


