गोगटे- जोगळेकर महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी जाणून घेतला नगराध्यक्षा शिल्पा सुर्वे यांचा राजकीय प्रवास

रत्नागिरी दि. १२ ऑगस्ट : कुटुंबात कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसताना मी राजकीय क्षेत्रात आले आणि कुटुंबियांच्या मिळालेल्या पाठिंब्यामुळे मी नगराध्यक्ष पदापर्यंत पोहोचू शकले, या पदावर कार्यरत असताना अधिकाधिक लोकहिताची कामे करण्याचा प्रयत्न करणार असल्याचे मत रत्नागिरी नगर परिषदेच्या नगराध्यक्षा सौ शिल्पा प्रशांत सुर्वे यांनी येथे व्यक्त केले.
गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या राज्यशास्त्र विभागाच्या विद्यार्थ्यांनी नगरपरिषदेत घेतलेल्या मुलाखतीत त्या बोलत होत्या.
महाविद्यालयाच्या महिला विकास कक्षाच्यावतीने दरवर्षी स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून ‘आपण साऱ्याजणी’ हे भित्तीपत्रक प्रकाशित करण्यात येते. या भित्तीपत्रकासाठी राज्यशास्त्र विभागाच्या प्रथम आणि तृतीय वर्षाच्या विद्यार्थ्यांनी ‘NEP-2020’ अंतर्गत नव्याने समाविष्ट करण्यात आलेल्या व्यावसायिक कौशल्य अभ्यासक्रमअंतर्गत नगराध्यक्षा शिल्पा सुर्वे यांची मुलाखत घेतली.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकातून राज्यशास्त्र विभागाचे प्रमुख प्रा. निलेश पाटील यांनी या कार्यक्रमामागील हेतू स्पष्ट केला. त्यानंतर महिला विकास कक्षाच्या समन्वयिका डॉ. सोनाली कदम यांच्या हस्ते सौ. शिल्पा सुर्वे यांचा महाविद्यालयाच्या वतीने सहकार वार्षिकांक आणि पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.
या मुलाखतीदरम्यान नगराध्यक्षा सुर्वे यांनी लोकप्रतिनिधी आणि नगराध्यक्ष म्हणून करीत असलेले कार्य आणि जबाबदाऱ्या, रत्नागिरी शहराच्या विकासासाठी सुरू असलेले विविध उपक्रम, स्थानिक स्वराज्य संस्थेचे कार्य, महिलांचे राजकीय सक्षमीकरण तसेच प्रशासनातील अनुभव अशा अनेक पैलूंवर विद्यार्थ्यांनी संवाद साधला.
याप्रसंगी महिला विकास कक्षाच्या समन्वयक डॉ. सोनाली कदम आणि सदस्य प्रा. बी. डी. सुतार, राज्यशास्त्र विभागाचे विभागप्रमुख प्रा. निलेश पाटील, प्रा. अक्षय झोरे आदींसह राज्यशास्त्र विभागातील प्रथम व तृतीय वर्षाचे ३२ विद्यार्थी उपस्थित होते.
विद्यार्थ्यांनी विविध प्रश्नांच्या माध्यमातून नगराध्यक्षा शिल्पा सुर्वे यांच्याकडून त्यांचा राजकीय प्रवास जाणून घेतला.
विद्यार्थ्यांना लोकप्रतिनिधीशी प्रत्यक्ष संवाद साधण्याची तसेच स्थानिक स्वराज्य संस्था आणि प्रशासनाच्या कार्यपद्धतीचा जवळून परिचय करून घेण्याची संधी या उपक्रमातून प्राप्त झाली. या मुलाखत ‘आपण साऱ्याजणी’ या भित्तीपत्रकात प्रसिद्ध करण्यात येणार आहे. कार्यक्रमाच्या शेवटी डॉ. सोनाली कदम यांनी उपस्थित मान्यवर आणि विद्यार्थ्यांचे आभार मानले.


