गणपती स्पेशलला कडवई थांबा मंजूर!
'निसर्गरम्य चिपळूण आणि संगमेश्वर रेल्वे’ फेसबुक ग्रुपच्या मागणीला अखेर यश!

मुंबई दि. १२ ऑगस्ट : कडवई रेल्वे स्थानकावर गणपती स्पेशल गाडीला थांबा मिळावा, यासाठी ‘निसर्गरम्य चिपळूण आणि संगमेश्वर रेल्वे’ फेसबुक ग्रुपचे प्रमुख संदेश जिमन यांनी कोकण रेल्वेकडे निवेदन देऊन मागणी केली होती.
या मागणीला अखेर यश आले असून, गाडी क्रमांक 01153 / 01154 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस– रत्नागिरी गणपती स्पेशलला कडवई रेल्वे स्थानकावर थांबा मंजूर करण्यात आला आहे.
गणपती उत्सवाच्या पार्श्वभूमीवर दरवर्षी मोठ्या संख्येने चाकरमानी आणि प्रवासी कोकणात येत असतात. त्यामुळे कडवई रेल्वे स्थानकावर या विशेष गाडीला थांबा मिळावा, अशी मागणी करण्यात आली होती. या मागणीसाठी सातत्याने करण्यात आलेल्या पाठपुराव्याला अखेर यश मिळाले आहे.या मागणीला पाठिंबा देत आमदार शेखर निकम सर यांनीही कडवई रेल्वे स्थानकावर थांबा मिळावा, यासाठी कोकण रेल्वेला पत्र दिले होते. या महत्त्वपूर्ण पाठपुराव्यासाठी आमदार शेखर निकम यांचे श्री संदेश जिमन यांनी आभार मानले आहेत.
कडवई रेल्वे स्थानकाला मिळालेला हा थांबा कडवई परिसरातील नागरिक, संगमेश्वरकर तसेच कोकण वासीयांसाठी मोठी सुविधा ठरणार आहे. सर्वांच्या सहकार्याने, एकजुटीने आणि सातत्यपूर्ण पाठपुराव्याने मिळवलेला हा मोठा विजय आहे!



