रत्नागिरी

रत्नागिरीत सीए विद्यार्थ्यांसाठी संवाद सत्राला उदंड प्रतिसाद

आयसीएआयचे राष्ट्रीय उपाध्यक्ष सीए मंगेश किनरे यांचे मोलाचे मार्गदर्शन

रत्नागिरी दि. २१ : इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाऊंटंट्स ऑफ इंडियाच्या रत्नागिरी शाखेतर्फे सीए विद्यार्थ्यांसाठी एका विशेष संवाद सत्राचे यशस्वी आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाला आयसीएआयचे राष्ट्रीय उपाध्यक्ष सीए मंगेश किनरे यांनी प्रमुख अतिथी आणि मार्गदर्शक म्हणून उपस्थित राहून विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधला. हा कार्यक्रम विवा एक्झिक्यूटीव्ह येथे पार पडला.

कार्यक्रमाची सुरुवात रत्नागिरी शाखेचे अध्यक्ष सीए केदार करंबेळकर यांच्या उद्घाटनपर भाषणाने झाली. त्यांनी, सीएच्या विद्यार्थ्यांना थेट राष्ट्रीय पातळीवरील नेतृत्वाशी, विशेषतः उपाध्यक्षांशी संवाद साधण्याची संधी मिळणे किती महत्त्वपूर्ण आणि प्रेरणादायी आहे, यावर भर दिला.

डब्लूआयआरसी सदस्य सीए संजय निकम यांनी विद्यार्थ्यांना चार्टर्ड अकाऊंटंट असणे म्हणजे नेमके काय? आणि या पदवीची समाजातील प्रतिष्ठा व जबाबदारी याविषयी अत्यंत प्रभावी मार्गदर्शन केले. डब्लूआयआरसी सदस्य सीए मंगेश घाणेकर यांनी विद्यार्थ्यांना अभ्यासाचे नियोजन आणि परीक्षेसाठीच्या महत्त्वपूर्ण टिप्स दिल्या, तसेच भविष्यातील व्यावसायिक योजनांवर प्रकाश टाकला.

मुख्य मार्गदर्शक आणि आयसीएआयचे उपाध्यक्ष सीए मंगेश किनरे यांनी विद्यार्थ्यांना बदलत्या जागतिक अर्थव्यवस्थेत फ्युचर रेडी (भविष्यासाठी सज्ज) कसे व्हावे, याचे सखोल मार्गदर्शन केले. तंत्रज्ञान आणि नवीन आर्थिक सुधारणांचा स्वीकार करून स्वतःला अद्ययावत राहावे लागेल, असे आवाहन त्यांनी केले. “कोणत्याही प्रकारच्या शंका, नियम किंवा संभ्रमाबाबत सोशल मीडियावरील पोस्ट्सवर विश्वास ठेवण्याऐवजी किंवा तिथे चर्चा करण्याऐवजी विद्यार्थ्यांनी थेट आयसीएआयकडे संपर्क साधून अधिकृत स्पष्टीकरण मिळवावे.” असा अत्यंत महत्त्वाचा सल्ला त्यांनी विद्यार्थ्यांना दिला.

सूत्रसंचालन हर्षाली केळकर हिने केले. रत्नागिरी शाखेचे उपाध्यक्ष सीए अक्षय जोशी यांनी आभार मानले. सचिव नचिकेत जोशी आणि खजिनदार शरदचंद्र वझे यांच्यासह रत्नागिरी जिल्ह्यातील सुमारे १०० हून अधिक सीए विद्यार्थी उपस्थित होते. वंदे मातरमने कार्यक्रमाची सांगता झाली.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button