अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, शाखा, चिपळूण आयोजित बालनाट्य शिबिराचा समारोप; ५० मुलांचा उत्स्फूर्त सहभाग

चिपळूण दि. १५ : अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, शाखा, चिपळूण आयोजित बालनाट्य शिबीर या दहा दिवसीय उपक्रमाची सांगता रविवारी उत्साहपूर्ण वातावरणात झाली. दि. १ ते १० मे या कालावधीत पार पडलेल्या या शिबिरात सुमारे ५० बालकलाकारांनी सहभाग घेतला.
बेंदरकर आळी येथील माधवबाग सभागृहात आयोजित शिबिरामध्ये अभिनय, संवादफेक, शरीरभाषा, रंगमंचावरील हालचाली, स्टेज डेरिंग, व्यक्तिमत्व विकास तसेच समूहात काम करण्याची कला यांचे प्रशिक्षण देण्यात आले. प्रा. रश्मी नंदकुमार देव यांनी मुलांना विविध विषयांवर प्रभावी मार्गदर्शन केले. आदर्श नागरिक घडविण्यासाठी आवश्यक मूल्यांचाही या शिबिरात समावेश करण्यात आला होता.
गेल्या तीन वर्षांपासून नाट्य परिषदेच्या माध्यमातून हे शिबिर सातत्याने आयोजित केले जात आहे. शिबिराचा सांगता समारंभ इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्र, चिपळूण येथे मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी मुख्याधिकारी संजय जाधव, नाट्य परिषदेचे अध्यक्ष डॉ. प्रशांत पटवर्धन, प्रशिक्षण मार्गदर्शिका प्रा. रश्मी नंदकुमार देव, ॲड. विभावरी रजपूत आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. मीनल ओक यांनी केले.
सांगता समारंभात बालकलाकारांनी नाट्य अभिवाचन, आई मला भूक लागली ही बाल नाटुकली, झेप ही एकांकिका, मुकाभिनय, नाट्यछटा आणि कथाकथन यांसारखे विविध नाट्यप्रकार सादर केले. मुलांचा आत्मविश्वास, वक्तशीरपणा, रंगमंचावरील वावर आणि अभिनय कौशल्य यांना उपस्थितांनी उत्स्फूर्त दाद दिली.
मुख्याधिकारी संजय जाधव यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, शाखा – चिपळूण ही संस्था केवळ नाट्यप्रयोग सादर करणारी नसून भावी पिढी घडविण्याचे महत्त्वपूर्ण कार्य करणारी सांस्कृतिक चळवळ आहे. अशा शिबिरांमधून मुलांमध्ये आत्मविश्वास, संवादकौशल्य आणि सामाजिक जाणीव विकसित होते.
शिबिराच्या प्रकल्प प्रमुख म्हणून ॲड. विभावरी रजपूत यांनी जबाबदारी सांभाळली. त्यांना संजय सरदेसाई, संगीता जोशी, अपर्णा नातू, स्नेहल जोशी, छाया पोटे, संजय कदम, मंगेश बापट, रंजना मोरे, शोभा वाडकर, योगेश बंडागळे आणि डॉ. मीनल ओक यांनी सहकार्य केले. माधवबाग व्यवस्थापनाने सभागृह विनामूल्य उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांचे विशेष आभार मानण्यात आले.
शिबिरानंतर पालकांनीही समाधान व्यक्त केले. मुलांना स्टेजवर बोलण्याचे धाडस मिळाले, विविध नाट्यप्रकार अनुभवायला मिळाले आणि त्यांच्यातील कला अधिक खुलली, अशा भावना पालकांनी व्यक्त केल्या. तसेच असे शिबिर दरवर्षी आयोजित करण्याची अपेक्षाही त्यांनी मांडली.


