महिला दिनानिमित्त चिरेखणीवरील महिला कामगारांची आरोग्य तपासणी
कोतवडे प्राथमिक आरोग्य केंद्राचा आगळावेगळा उपक्रम

रत्नागिरी, दि. ८ : आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे औचित्य साधून प्राथमिक आरोग्य केंद्र कोतवडे (ता. रत्नागिरी) येथील वैद्यकीय अधिकारी व आरोग्य कर्मचाऱ्यांनी दुर्गम भागात जाऊन महिला कामगारांच्या आरोग्य तपासणीचा स्तुत्य उपक्रम राबविला.
मिरवणे येथील धनगरवाडी परिसरातील चिरेखणी व आंबा बागेत काम करणाऱ्या महिला, गुरखा महिला, मुली तसेच बालकांची प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणी जाऊन आरोग्य तपासणी करण्यात आली. या तपासणीदरम्यान आवश्यक औषधांचे वाटप करण्यात आले. तसेच महिला दिनाच्या निमित्ताने उपस्थित महिलांना पुष्प, भेटवस्तू आणि पौष्टिक खाऊ देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. त्यामुळे दुर्गम व श्रमप्रधान काम करणाऱ्या महिलांसाठी हा महिला दिन आगळावेगळ्या पद्धतीने साजरा करण्यात आला.
यावेळी प्राथमिक आरोग्य केंद्र कोतवडेच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. मुक्तेश्वरी पाखरे व डॉ. मंदार कुलकर्णी यांनी महिलांना आरोग्यविषयक महत्त्वपूर्ण मार्गदर्शन केले. त्यांनी ऍनिमिया मुक्त भारत अभियान, एचपीव्ही (HPV) लसीकरणाचे महत्त्व, कुटुंब कल्याण उपाययोजना, तसेच गरोदर मातांनी घ्यावयाचा पौष्टिक आहार व आरोग्य काळजी याबाबत सविस्तर माहिती दिली.
या उपक्रमात कोतवडे आरोग्य केंद्राच्या श्रीमती दिव्यांका केतकर,सौ. आदिती मांडवकर,सौ. लीना हातखंबकर, श्रीमती नेहा जाधव, श्रीमती सोनाली शेलार, सुरेखा झोरे यांनी सक्रिय सहभाग घेतला.
महिलांच्या कार्यस्थळी जाऊन त्यांची आरोग्य तपासणी व जनजागृती केल्यामुळे उपस्थित महिलांनी समाधान व्यक्त केले. प्राथमिक आरोग्य केंद्र कोतवडेच्या या उपक्रमामुळे दुर्गम भागातील महिलांपर्यंत आरोग्य सेवा पोहोचविण्याचा प्रभावी संदेश देण्यात आला.



