कॉम्रेड्स मॅरेथॉनमध्ये रत्नागिरीच्या प्रसाद देवस्थळी व अभिजित पड्याळ यांची दमदार कामगिरी

रत्नागिरी, दि. १४ : दक्षिण आफ्रिकेत आज रविवारी आयोजित करण्यात आलेल्या जगप्रसिद्ध आणि अत्यंत खडतर कॉम्रेड्स अल्ट्रा मॅरेथॉन स्पर्धेत रत्नागिरीच्या प्रसाद देवस्थळी आणि अभिजित पड्याळ या दोघांनीही यशस्वीपणे ९० किलोमीटरची मॅरेथॉन पूर्ण करून जिल्ह्याचा गौरव वाढविला आहे.
डर्बन ते पीटरमॅरिट्झबर्ग दरम्यानच्या अत्यंत आव्हानात्मक ‘अप रन’ मार्गावर पार पडलेल्या या स्पर्धेत अभिजित पड्याळ यांनी पहिल्याच सहभागात ९ तास ५१ मिनिटांत स्पर्धा पूर्ण करत उल्लेखनीय कामगिरी केली. तर सुवर्णसूर्य फाउंडेशनचे संस्थापक आणि संगमेश्वर तालुक्यातील धामापूरचे सुपुत्र प्रसाद देवस्थळी यांनी सलग दुसऱ्या वर्षी कॉम्रेड्स मॅरेथॉन पूर्ण करण्याचा मान पटकावला. त्यांनी ही स्पर्धा ११ तास २७ मिनिटांत पूर्ण केली.
गतवर्षी प्रसाद देवस्थळी यांनी एकट्याने या स्पर्धेत सहभाग घेतला होता. यावर्षी त्यांनी रत्नागिरीचे अभिजित पड्याळ यांनाही सोबत घेतले आणि दोघांनीही आपल्या जिद्द, चिकाटी आणि कठोर परिश्रमाच्या जोरावर ही जागतिक दर्जाची स्पर्धा यशस्वीरित्या पूर्ण केली.
दोघांच्या यशस्वी कामगिरीची माहिती समोर येताच रत्नागिरीत आनंदाचे वातावरण निर्माण झाले. सुवर्णसूर्य फाउंडेशन, रत्नागिरी सायकलिस्ट क्लब, टीम कोकण कोस्टल आणि टीम गणपतीपुळे अल्ट्रा मॅरेथॉन यांच्या वतीने दोघांचे अभिनंदन करण्यात आले.
कॉम्रेड्स मॅरेथॉनसाठी दक्षिण आफ्रिकेत जमलेल्या हजारो धावपटूंना रत्नागिरीत आयोजित करण्यात येणाऱ्या कोकण कोस्टल मॅरेथॉन आणि गणपतीपुळे अल्ट्रा मॅरेथॉनमध्ये सहभागी होण्यासाठी निमंत्रण देण्यात आले. भविष्यात जगभरातील धावपटू या स्पर्धांकडे आकर्षित होतील, असा विश्वास सुवर्णसूर्य फाउंडेशनच्या वतीने व्यक्त करण्यात आला.
उद्योग, मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी केले अभिनंदन
राज्याचे उद्योग, मराठी भाषा व जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी प्रसाद देवस्थळी आणि अभिजित पड्याळ यांचे अभिनंदन करताना म्हटले आहे की, “कॉम्रेड्स अल्ट्रा मॅरेथॉनसारख्या जगप्रसिद्ध आणि अत्यंत खडतर स्पर्धेत सहभागी होऊन ती यशस्वीपणे पूर्ण करणे ही मोठी अभिमानाची बाब आहे. कोकणाच्या मातीत वाढलेल्या या दोन्ही धावपटूंनी आपल्या मेहनतीच्या बळावर आंतरराष्ट्रीय स्तरावर रत्नागिरीचे नाव उंचावले आहे. त्यांची ही कामगिरी जिल्ह्यातील तरुणांसाठी प्रेरणादायी आहे.”
त्यांनी दोघांनाही जिल्ह्याच्या वतीने तसेच वैयक्तिकरित्या हार्दिक शुभेच्छा आणि अभिनंदन केले.


