रत्नागिरी

रत्नागिरी येथे नागरी संरक्षण दलाच्या नूतनीकरण कार्यालयाचे उद्घाटन उत्साहात

रत्नागिरी दि. ८ : महाराष्ट्र शासनाच्या गृह विभाग (विशेष) व जिल्हा उपनियंत्रक अधिकारी, नागरी संरक्षण दल, रत्नागिरी यांच्या नूतनीकरण करण्यात आलेल्या कार्यालयाचे उद्घाटन समारंभ शनिवार, दिनांक ७ मार्च २०२६ रोजी उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.

या नूतनीकरण कार्यालयाचे उद्घाटन राज्याचे उद्योगमंत्री ना. डॉ. उदय स्वरूपा रविंद्र सामंत यांच्या शुभहस्ते करण्यात आले. कार्यक्रमास जिल्हाधिकारी मा. श्री. मनुज जिंदाल यांची प्रमुख उपस्थिती लाभली.

कार्यक्रमाच्या प्रारंभी जिल्हा उपनियंत्रक अधिकारी कर्नल श्री. प्रशांत चतुर (नि.)यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले. त्यांनी नागरी संरक्षण दलाच्या कार्यपद्धतीबाबत सविस्तर माहिती देताना सांगितले की, नैसर्गिक आपत्ती, पूर, वादळ, भूकंप, आग, अपघात अशा आपत्कालीन परिस्थितीत नागरी संरक्षण दल नागरिकांच्या मदतीसाठी सदैव तत्पर असते. आपत्ती व्यवस्थापन, बचावकार्य, प्राथमिक उपचार, नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविणे तसेच आपत्कालीन परिस्थितीत प्रशासनाला मदत करणे या विविध महत्त्वाच्या जबाबदाऱ्या नागरी संरक्षण दल पार पाडत असते.

तसेच जिल्ह्यातील स्वयंसेवकांना नियमित प्रशिक्षण देऊन त्यांना आपत्ती व्यवस्थापनासाठी सक्षम केले जात असल्याचेही त्यांनी नमूद केले. भविष्यात नागरी संरक्षण दल अधिक सक्षम व प्रभावीपणे कार्य करेल, यासाठी प्रशासनाचे सहकार्य आवश्यक असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

यावेळी नियोजन अधिकारी श्री. अमर पाटील, जिल्हा माहिती अधिकारी श्री. प्रशांत सातपुते, कृषी अधिकारी श्री. शिवकर सदाफुले, कोषागार व वित्त विभागाचे श्री. अमृत पाटील तसेच स्वीय सहाय्यक श्री. नेताजी पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

समारंभादरम्यान मान्यवरांनी नागरी संरक्षण दलाच्या कार्याचे कौतुक करत या दलाची भूमिका समाजासाठी अत्यंत महत्त्वाची असल्याचे सांगितले. नव्याने नूतनीकरण करण्यात आलेल्या कार्यालयामुळे नागरी संरक्षण दलाच्या कामकाजाला अधिक गती मिळून नागरिकांना अधिक प्रभावी सेवा देता येणार असल्याचा विश्वासही यावेळी व्यक्त करण्यात आला.

या कार्यक्रमास विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी तसेच नागरी संरक्षण दलाचे स्वयंसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांच्या साक्षीने हा उद्घाटन समारंभ उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button