रत्नागिरीराजकीय

मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या यशस्वी पर्वाचा भाजप नेते आमदार प्रमोद जठार यांनी मांडला सविस्तर लेखाजोखा

रत्नागिरी दि. १४ : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारला यशस्वी १२ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर, भारतीय जनता पक्ष रत्नागिरी जिल्ह्याच्या वतीने एका विशेष पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या परिषदेत भाजप नेते आमदार प्रमोद जठार यांनी मोदी सरकारच्या ऐतिहासिक कामगिरीचा आणि जनकल्याणाचा सविस्तर लेखाजोखा मांडला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या १२ वर्षांत समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत विकास पोहचवून जनतेमध्ये एक नवा आणि दृढ विश्वास निर्माण केला असल्याचे प्रतिपादन जठार यांनी यावेळी केले.

यावेळी देशातील राजकीय स्थैर्यावर भाष्य करताना आमदार जठार म्हणाले की, २०१४ पूर्वी देशात काँग्रेस किंवा त्यांच्या आघाडीशिवाय अन्य कोणतेही सरकार सलग १० ते १२ वर्षे स्थिर राज्य करू शकते, यावर जनतेचा विश्वास नव्हता. १९७७ मध्ये आणीबाणीनंतर जनता पक्षाचा प्रयोग अपयशी ठरल्याने हा अविश्वास अधिकच वाढला होता. मात्र, भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांनी लावलेले विकासाचे रोपटे पुढे नेत नरेंद्र मोदी यांनी सलग १२ वर्षे देशात स्थिर आणि पारदर्शक लोकशाही सरकार चालवून दाखवले आहे. जर राजा किंवा नेता प्रामाणिक आणि प्रजेची काळजी घेणारा असेल, तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या आदर्शावर चालणारे सुराज्य उभे राहू शकते, यावर मोदीजींच्या कार्यकाळाने आता शिक्कामोर्तब केले आहे.

मोदी सरकारच्या आर्थिक क्रांतीचा आणि भ्रष्टाचारमुक्त प्रशासनाचा उल्लेख करताना ते म्हणाले की, २६ मे २०१४ पासून देशातील गरीब जनतेला मिळणारा प्रत्येक लाभ हा ‘डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर’ (DBT) च्या माध्यमातून थेट त्यांच्या बँक खात्यात जमा होत आहे. पूर्वी सरकारी योजनांचा केवळ १५ पैसे लाभ गरिबांपर्यंत पोहचायचा, मात्र आता शेतकरी सन्मान योजना, महिला सन्मान योजना यांमुळे १०० टक्के लाभ थेट लाभार्थ्याला मिळत आहे. अंबानी-टाटांपासून ते अगदी सामान्य नागरिकांपर्यंत देशातील ९० टक्के जनतेचे आर्थिक नियोजन डिजिटल क्रांतीमुळे काटेकोर झाले असून ८ नोव्हेंबर २०१६ च्या ऐतिहासिक निश्चलनीकरणामुळे (नोटबंदी) देशातील भ्रष्टाचाराला मोठा लगाम लागला आहे.

याच सोबतीने ‘एक देश, एक कर’ अंतर्गत जीएसटी लागू केल्याने देशाची अर्थव्यवस्था मजबूत झाली असून, त्यातूनच आज गरिबांना मोफत धान्य दिले जात आहे. उज्वला गॅस योजना, पीएम किसान योजना आणि सक्षम पायाभूत सुविधांमुळे देशातील २५ टक्के जनता गरिबी रेषेच्या वर आली आहे. केवळ आर्थिकच नव्हे, तर देशाचा सांस्कृतिक मानबिंदूही मोदीजींनी उंचावला आहे. ५०० वर्षांचे स्वप्न असलेले अयोध्येतील भव्य राम मंदिर, काशी विश्वनाथ कॉरिडॉरचे पुनरुत्थान आणि जगभरात ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ सुरू करून भारतीय संस्कृतीला जागतिक प्रतिष्ठा मिळवून दिली आहे. ८० टक्के हिंदू समाज बहुसंख्याक असलेल्या या देशात सर्व धर्मांचा सन्मान राखत लोकशाही अधिक मजबूत झाली असून, अहिल्याबाई होळकर, झाशीची राणी लक्ष्मीबाई आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासारख्या महापुरुषांच्या विचारांना या सरकारने खऱ्या अर्थाने सन्मान दिला आहे.

अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य आणि देशाची सुरक्षा या सर्वच आघाड्यांवर मोदी सरकारने अभूतपूर्व कामगिरी केली आहे. या यशस्वी १२ वर्षांबद्दल रत्नागिरी जिल्हा भाजपच्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण यांचे विशेष आभार मानण्यात आले असून, मोदीजींना निरोगी आणि दीर्घायुष्य लाभो, अशी सदिच्छा आमदार प्रमोद जठार यांनी या पत्रकार परिषदेत व्यक्त केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button