रत्नागिरी

रत्नागिरी शहरातील पाण्याचे मीटर चोरणारा गजाआड

रत्नागिरी शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाची कामगिरी

रत्नागिरी दि. ८ : गेल्या काही दिवसांपासून शहरातील विविध ठिकाणी होत असलेल्या पाणी मीटर चोरीप्रकरणी रत्नागिरी शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाला गोपनीय माहिती आणि सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे चोरी करणाऱ्याला गजाआड करण्यात यश आले आहे. साहिल संजय जाधव (वय २५, रा. फगरवठार, रत्नागिरी) याला ताब्यात घेऊन त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने दाखल गुन्ह्यातील बीएसएनएल कार्यालय (रत्नागिरी) परिसरातील तीन पाण्याचे मीटर चोरी केल्याची कबुली दिली आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी, रत्नागिरी शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत पाण्याचे मीटर चोरी होत असल्याबाबत पोलीस ठाण्यात तक्रारी अर्ज प्राप्त झाले होते. तसेच २४ ते २५ फेब्रुवारी या कालावधीत बीएसएनएस कार्यालय येथून तीन पाण्याचे मीटर चोरी झाल्याची तक्रार ६ मार्च रोजी रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला होता.

या प्राप्त तक्रारी अर्ज व दाखल गुन्ह्याच्या अनुषंगाने आरोपीचा शोध घेऊन चोरीस गेलेले पाण्याचे मीटर हस्तगत करण्याच्या सूचना जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे, अपर पोलीस अधीक्षक बी. बी. महामुनी व उपविभागीय पोलीस अधिकारी नीलेश माईनकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विवेक पाटील यांनी रत्नागिरी शहर पोलीस ठाण्याचे गुन्हे प्रकटीकरण पथकाचे अधिकारी /अंमलदार यांना दिल्या होत्या. त्याप्रमाणे आरोपीबाबत गोपनीय माहिती प्राप्त करण्याचे काम चालू होते.

६ मार्च रोजी रत्नागिरी शहर पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण पथकातील पोलीस उपनिरीक्षक सागर शिंदे व पोलीस अंमलदार यांनी प्राप्त तक्रारी अर्ज व दाखल गुन्ह्याच्या अनुषंगाने गोपनीय माहितीच्या तसेच सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे साहिल संजय जाधव याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने दाखल गुन्ह्यातील बीएसएनएल कार्यालय परिसरातील तीन पाण्याचे मीटर चोरी केल्याचे कबूल केले आहे.

त्याला ६ मार्च रोजी रात्री ११.४५ वाजण्याच्या सुमारास अटक करण्यात आले. त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता त्याने ७ मार्च रोजी निवेदन दिल्याने चोरी केलेले २९ हजार रुपये किंमतीचे तीन पाण्याचे मीटर मेमोरंडम पंचनामा करून हस्तगत करण्यात आले आहेत.

तसेच प्राप्त तक्रारी अर्जांमधील चोरीला गेलेले काही पाण्याचे मीटर जप्त करण्याची कारवाई सुरू आहे. याच्याकडे अन्य दाखल घरफोडीचे गुन्ह्यांबाबत चौकशी केली असता त्याने रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा रजि. नं. ३४६/२०२५ भा.न्या.सं. कलम ३०५ (क), ३३१ (४) अन्वये दाखल घरफोडीचा गुन्हा केल्याची कबुली दिली आहे. या गुन्ह्यात त्याला वर्ग करून घेऊन गुन्ह्यातील चोरीस गेलेला मुद्देमाल हस्तगत करण्याची कार्यवाही सुरू आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक श्री. बगाटे, अपर पोलीस अधीक्षक श्री. महामुनी, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. माईनकर यांच्या मार्गदर्शनाखाली शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक विवेक पाटील व गुन्हे प्रकटीकरण पथकातील पोलीस उपनिरीक्षक सागर शिंदे, सहाय्यक पोलीस फौजदार दीपक साळवी, पोलीस हेड कॉन्स्टेबल अमोल भोसले, आशिष भालेकर, पंकज पडेलकर, भालचंद्र मयेकर व पोलीस कॉन्स्टेबल अमित पालवे यांनी केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button